बापाची मुलीला आर्त विनवणी, 'बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी'

A police officer's life was lost due to mistake
A police officer's life was lost due to mistake

नागपूर : ‘बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी' ही बापाने आपल्या मुलीला केलेली आर्त विनवणी... अगदीच कोणाचेही जीव हेलावून टाकणारी आहे... परंतु, निर्दयी प्रशासनाला आणि निगरगट्ट अधिकाऱ्यांना त्याचे काय? बापाला वाचविण्याच्या प्रयत्नात कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी मुलीने अख्खी रात्र मनपा आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांना फोन आणि मॅसेज करून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी तिला कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर तिच्या धडधाकट बापाचा कोविड-१९ने गुरुवारी (६ ऑगस्ट) मृत्यू झाला...

मन हेलावून टाकणारी ही कहाणी आहे मुख्यालयात नेमणुकीवर असलेल्या सहायक उपनिरीक्षक भगवान शेजूळ (वय ५४) यांची. २६ जुलैला प्रकृती बरी वाटत नसल्याने भगवान यांनी सुटी घेतली. त्यानंतर त्यांना अधिकच अस्वस्थ वाटत असल्याने कुटुंबीय त्यांना दोन ऑगस्टला खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. तेथे त्यांना बरेच तास उगाच बसवून ठेवण्यात आले. त्यांचा त्रास वाढत चालला होता. फुफ्फुसात इन्फेक्शन व्हायला लागले होते. परंतु, बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना उपचाराविनाच पाठविण्यात आले.

यानंतर कुटुंबीय भगवान यांना घेऊन दुसऱ्या खाजगी रुग्णालयात गेले. या रुग्णालयात कोरोना सेंटर नाही. फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने त्यांची प्रकृती चांगलीच खालावली. तेथेही त्यांना आवश्यक ट्रिटमेंट मिळू शकली नाही. शेवटी मुलीने पोलिस अधिकारी आणि मनपा आयुक्तांनाही मदतीसाठी फोन केले. शेवटी पोलिस हॉस्पिटलचे डॉ. संदीप शिंदे हे मदतीला धावून आले. रुग्णालयात भगवान यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तो अहवाल मिळेपर्यंत सीताबर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राघवेंद्र राजपूत त्यांच्यासोबत होते.

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच डॉक्टरांनी भगवान यांना मेडिकलला शिफ्ट करायला सांगितले. तातडीने उपचारासाठी भगवान यांना मेडिकलमध्ये शिफ्ट करणे गरजेचे होते. भगवान हे देखील 'बेटा मला इथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे, तुमच्यासाठी' अशी विनवणी मुलीला करू लागले. परंतु, मेडिकलमध्ये शिफ्ट करण्यासाठी साधी रुग्णवाहिका चालणार नव्हती. त्यासाठी गरज होती ती कार्डियाक रुग्णवाहिकेची. रात्रभर ती रडत राहिली पण रुग्णवाहिका मिळाली नाही.

मुलीने केले जीवाचे रान, पण...

कार्डियाक रुग्णवाहिका केवळ वोक्हार्ट हॉस्पिटलकडेच आहे. ती उपलब्ध व्हावी यासाठी नेहा सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करीत होती. परंतु, तिच्या कॉल आणि मॅसेजला कोणीही प्रतिसाद दिला नाही. धडधाकट शरीरयष्टीचा वाघासारखा बाप हॉस्पिटलमध्ये एका एका श्‍वासासाठी लढत होता तर बापाला मेडिकलमध्ये शिफ्ट करायला रुग्णवाहिका मिळावी म्हणून मुलीने जीवाचे रान केले होते.

मदत वेळेवर केली असती तर

भगवान शेजूळ यांना पाच ऑगस्टला सकाळी ७.३० वाजता कसेबसे मेडिकलमध्ये शिफ्ट करण्यात आले. तेथे त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. त्यावेळी त्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन ५० टक्के झाले होते. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले. काही वेळाने त्यांना जरे बरे वाटायला लागले. मात्र, काही वेळातच ते व्हेंटिलेटर बदलून त्यांना दुसरे ऑक्सिजन सिलेंडर लावण्यात आले. परंतु, पहिले काढून दुसरे लावण्यात जो वेळ लागला त्याच वेळाने त्यांचा जीव घेतला. प्रशासनाने त्यांना मदत केली, पण ती मदत जर वेळेवर केली असती तर भगवान यांचा जीव वाचला असता.

पोलिस हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरच नाही

कोविड-१९ पासून लोकांना वाचविण्यासाठी पोलिसांनी जीवाची बाजी लावली आहे. मात्र, त्या पोलिसांना कोविडपासून वाचविण्याची सोय पोलिस हॉस्पिटल येथे नाही. गिट्टीखदान रोडवरील पोलिस मुख्यालयात पोलिस हॉस्पिटल आहे. तेथे सर्व सोयीसुविधा असल्याचे सांगण्यात येते. मात्र, रात्रंदिवस शहरात कोविडविरुद्ध लढा देणाऱ्या पोलिसांचा उपचार करण्यासाठी कोविड सेंटर नाही. तेथे कोविड ओपीडी चालविण्यात येते. जेथे सर्दी, खोकला झाल्यास पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांची स्क्रिनिंग करून त्यांना उपचारासाठी पाठविण्यात येते. महा. पोलिस कल्याण योजनाअंतर्गत होप हॉस्पिटलशी टायअप करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे रुग्णांना पाठविण्यात येते. ऑरेज सिटी हॉस्पिटल पोलिस पॅनेलमध्ये आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलही पोलिस पॅनलमध्ये येते. पण, आमचे कार्डियाक युनिट वेगळे आहे, असे ते सांगतात.

प्रशासनाच्या दिरंगाईने घेतला जीव
वडिलांना वेळेत उपचार मिळावा म्हणून धडपड करीत होती. रात्रभर रुग्णवाहिका मिळाली नाही. बापाला वाचविण्यासाठी अख्खी रात्र मनपा आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांना फोन आणि मॅसेज करून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी तिला कोणताही प्रतिसाद दिला नाही. प्रशासनाच्या दिरंगाईने त्यांचा जीव घेतला.
- नेहा शेजूळ, मुलगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com