मी महाविद्यालयात कधी जाईल? सरकारच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी चिंतेत

मंगेश गोमासे
Thursday, 12 November 2020

अद्याप प्रवेशासाठी प्रक्रिया करण्यात आलेली नाही. आता, मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक असल्याने न्यायालयाच्या निर्णयावर प्रवेशाची प्रक्रिया अवलंबून आहे. विशेष म्हणजे, देशभरात आयआयटी, एनआयटी आणि इतर राज्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन संपण्याच्या मार्गावर आहेत.

नागपूर : कोरोना संकटामुळे महाविद्यालये बंद आहेत. विद्यापीठांमधील अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. परंतु, आतापर्यंत अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्ट, एमबीए, एमटेक यासह इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी कुठलीच प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी चिंतेत असून दुसरीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात मे महिन्यात बारावीचा निकाल लागताच अभियांत्रिकीसह फार्मसी, आर्किटेक्ट, एमबीए, एमटेक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे निकाल लावण्यात येऊन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येतात. मात्र, या वर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबल्या. यामुळे जुलैत बारावीचा निकाल लावण्यात आला. यानंतर एका महिन्याने एमएचसीईटी ही प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात आली. लवकरच या पात्रता परीक्षेचा निकाल लावण्यात आला.

क्लिक करा - पितळ पडले उघड; सरकार ४२६ शेतकऱ्यांकडून ३६ लाख रुपये करणार वसूल

मात्र, अद्याप प्रवेशासाठी प्रक्रिया करण्यात आलेली नाही. आता, मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक असल्याने न्यायालयाच्या निर्णयावर प्रवेशाची प्रक्रिया अवलंबून आहे. विशेष म्हणजे, देशभरात आयआयटी, एनआयटी आणि इतर राज्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन संपण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, राज्याच्या सीईटी सेलमार्फत अद्याप प्रवेशासाठी कुठलेच नोटीफिकेशन काढलेले नाही. त्यामुळे पालकांची काळजी वाढली आहे.

महाविद्यालयांवर आर्थिक संकट

राज्यात अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्ट, एमबीए, एमटेक अभ्यासक्रमात प्रवेश झाले नसल्याने महाविद्यालयांवर आर्थिक संकट आले आहे. प्रवेशावर महाविद्यालयांची आर्थिक भिस्त असल्याने महाविद्यालय संचालक बऱ्याच आर्थिक अडचणीत आले आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How long to wait for engineering admission