टिंबर सिटी'तील शंभर कोटींचा व्यवसाय ठप्प

राजेश रामपूरकर
बुधवार, 3 जून 2020

नागपूर हे देशातील लाकडाच्या आयात आणि निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. राज्यात सर्वाधिक आरामशीन येथे आहेत. महिन्याला 50 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होते.

नागपूर : टाळेबंदीमुळे देशातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उपराजधानीतील टिंबर मार्केटची आर्थिक घडी विस्कटली आहे. शहरात सर्वाधिक 550 टिंबर मार्ट असून, त्यात दोन हजार आरामशीन आहेत. यात अंदाजे एक लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात. टाळेबंदीमुळे बेरोजगार झाल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. टिंबर मार्केट बंद असल्याने या संबंधित व्यापारी, मजूर, वाहनधारकांची साखळी तुटली आहे. लाकडाची आयातही प्रभावित झाल्याने सरासरी 100 कोटींचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

नागपूर हे देशातील लाकडाच्या आयात आणि निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. राज्यात सर्वाधिक आरामशीन येथे आहेत. महिन्याला 50 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होते. एका आरामशीवर अंदाजे 50 कामगारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. मात्र, दोन महिन्यांपासून ठप्प झाल्याने 100 कोटींची उलाढाल प्रभावित झाली आहे. शहरात कॉनकॉरसह आणखी एक खासगी मालवाहतूक करणारे महत्त्वाचे डेपो आहे. दक्षिण अफ्रिका, घाना, म्यानमार, अमेरिका, ब्राझील, क्वोटीऍवेरी, नायझेरिया आदी देशांतून लाकडाची येथे आयात होते.

पैशाच्या देवाणघेवाणीचा वाद विकोपाला,  कन्हानमध्ये सात जणांनी केले हे क्रूर कृत्य

त्यावर प्रक्रिया करून शहरातून दक्षिण भारतासह उत्तर भारतात लाकडे व कच्चा माल पाठविण्यात येतो. दक्षिण भारतात घराच्या दरवाजाला अजूनही लाकडी चौकट बसविण्यात येत असल्याने त्या भागात लाकडाची सर्वाधिक मागणी असते. यामुळेच या शहराची टिंबर सिटी म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे. टाळेबंदीमुळे रेल्वे वाहतूक बंद असल्याने हा सर्वच व्यवसाय ठप्प झालेले आहेत. शहरातून दररोज 300 ट्रक, टेम्पोतून लाकडाची आवक जावक होत असते. तीही ठप्प झालेली आहे.

 

आक्‍टोंबर- जून व्यवसायात सुगीचे दिवस

जूनपासून पावसाळा सुरू होईल. ऑक्‍टोबरपर्यंत पावसाळा राहील. यानंतर हळूहळू टिंबर मार्केट पूर्वपदावर येऊ लागेल, अशी स्थिती आहे. कारण, ऑक्‍टोबर ते जून अशा काळातच येथील सर्वाधिक अर्थकारण गती घेत असते. पावासाळा सुरू झाला की, काम काहीसे ठप्प होते. टिंबर मार्केटवर सुतार, हमाल, टेम्पो, टूकधारक, बैलगाडीवाले, कामगार, कन्स्ट्रक्‍शन व्यवसायातील बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्‍टर्स, गवंडी, ट्रॅक्‍टर, ट्रॉली, बांबू उत्पादक, चहागाडी, छोटे हॉटेलवाले आटी घटक अवलंबून आहेत. हे सर्व घटक कोरोनाच्या टाळेबंदीमुळे जिथल्या तिथे थांबले आहेत. सध्या प्रत्येक व्यावसायिकांकडे लाखो रुपयांचा माल आपल्या गोडाऊनमध्ये आणून ठेवला. यानंतर हा माल विक्रीला सुरवात झाली होती. कोरोनाचा प्रभावामुळे टाळेबंदी केल्याने माल तशाच अवस्थेत गोदामात पडून असल्यानेही टिंबर मर्चंटचे संचालकही आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

 

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करु
दोन महिन्यांपासून टिंबर मार्केट बंद असल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले असताना कामगारांवरही उपासमारीची वेळ आलेली आहे. आरामशीन रेड झोनच्या बाहेर आहेत त्या सुरू करण्याची परवानगी द्यावी. असे केल्यास कामगारांवरील उपासमारीचे संकट टळेल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कामगारांकडून काम करून घेण्यास बंधनकारक करण्यात येईल.
-फारुक अकबानी, माजी उपाध्यक्ष, नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशन.

आकडे बोलतात

 

  • शहरातील आरामशीन : 550
  • थेट रोजगार : एक लाख कामगार
  • मासिक उलाढाल : 50 कोटी
  • कंटेनरची आवक जावक : 400
  • लाकडाची आवक : 20 ते 22 घनमीटर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundred crore business stalled in Timber City