विभक्त राहत असलेली पत्नी हरविल्याची तक्रार दिली पतीने; पोलिस तपासात पुढे आहे भयान सत्य

अनिल कांबळे
Thursday, 25 February 2021

काही महिन्यांपूर्वी ती त्याला सोडून वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत जिजामातानगर येथे नीलम यादव यांच्या घरी भाड्याने राहू लागली. २१ फेब्रुवारीला सायंकाळी ८.३० वाजता आरोपी तिच्याकडे आला व परत चलण्याची विनंती करीत होता.

नागपूर : पत्नीचे युवकाशी अनैतिक संबंध असून घरी कुणी नसताना तो घरी येत असल्याचा संशय पतीला होता. त्यामुळे पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह जंगलात फेकला. त्यानंतर पोलिस ठाण्यात पत्नी हरविल्याची खोटी तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपी पतीला अटक केली.

ही घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत चांदमारी परिसरातील झुडपी जंगलात उघडकीस आली. हंसा युवराज पटले (वय २८, रा. जिजामातानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. युवराज नेमचंद्र पटले (वय २८, रा. भिलगाव माजरी) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली. युवराज आणि पत्नी हंसा हे दोघेही एका बांधकाम कंत्राटदाराकडे मजुरी करायचे. दरम्यान, तिची बांधकाम कंत्राटदाराशी मैत्री झाली. दोघांचेही चांगले बोलणे-चालणे होते. त्याची कुणकूण पती युवराजला लागली.

अधिक वाचा - आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी; कॅलेंडरच्या तारखेतून घडला मेळघाटातील पहिला जिल्हाधिकारी

दोघांत अनैतिक संबंध निर्माण झाल्याचा संशय त्याला होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. तो मद्यप्राशन करून तिला मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी ती त्याला सोडून वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत जिजामातानगर येथे नीलम यादव यांच्या घरी भाड्याने राहू लागली. २१ फेब्रुवारीला सायंकाळी ८.३० वाजता आरोपी तिच्याकडे आला व परत चलण्याची विनंती करीत होता. पण, ती तयार नव्हती.

तेव्हा त्याने फिरायला चल असे म्हटले. ती त्याच्यासोबत गेली असता तो तिला घेऊन चांदमारी परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपी जंगलात घेऊन गेला. या ठिकाणी तिच्याशी वाद घालून गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह कचरा आणि पालापाचोळा टाकून झाकून ठेवला आणि घरी परत आला.

जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला

पत्नी हरविल्याची दिली खोटी तक्रार

युवराजने पोलिस ठाण्यात जाऊन पत्नी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केली असता तो तिच्यापासून वेगळा राहात असताना पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला हिसका दाखवला असता पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband murders wife on suspicion of immoral relationship