मी पुस्तक हातात घेतो, पण न वाचता ठेवून देतो..!

file photo
file photo

नागपूर : सांप्रत काळ विचित्र आहे. माणसात मिसळताही येत नाही. बाहेर वेदनेचा सडा पडलेला. या काळात मानसिक संपर्क टोकदार व्हायला हवेत. स्वत:ला भेटणेही आवश्‍यक. निवांतपणा असला, वाचन-लेखन होत असले, अडगळीत पडलेली कामे उरकण्याची संधी असली, तरी खूप अस्वस्थता दाटून आहे. प्रतिभावंतांच्या मनाचा धांडोळा घेतला असता काठोकाठ भरलेली उद्विग्नताच जाणवली. काही प्रतिक्रिया... 

काळासोबत राहण्याचा प्रयत्न 
मी माझ्या घरात जरी बद्ध असले, तरी माझे इतर व्यवहार ठप्प होत नाहीत. मी स्वयंपाक करते. घरातली रोजची कामं करते. भरपूर वाचते. लेखनाचे काही प्रकल्प पुढे सरकतात का हे पाहते. ऑनलाइन मुलाखती देते. सोशल मीडियावर "कोरोना काळातल्या कविता' या सध्या "इन थिंग' असणाऱ्या कार्यक्रमांसाठी माझ्या कवितावाचनाचे व्हिडिओही आवर्जून धाडते. मी काळासोबत राहण्याचा प्रयत्न करते. जग किती उलट्यापालट्या रितीने जाऊ शकेल पुढेमागे याचा विचार करते. अर्धे जग आम्हा बायांचंही आहे; जे सुंदर करण्यासाठी आम्हीही खूप काही दिलं आहे. पण, आता काय होणार त्याचं या विचाराने व्याकूळ होते. कॉलेज बंदच आहे लॉकडाउनमुळे; पण माझ्या विद्यार्थ्यांशी असणारा संवाद मी थांबवलेला नाही. सध्याच्या आव्हानांशी झगडताना आपल्याला स्वतःमध्ये अजून कितीएक प्रकारची मुदिता भिनवून घेण्याची निकड आहे हे मी त्यांना सांगू पाहते. "येस, द अनादर वर्ल्ड इज पॉसिबल' हे मी त्यांना सांगत असते की स्वतःलाच? 
-डॉ. प्रज्ञा दया पवार, 
कवयित्री, ठाणे 
 

नोबेल पुरस्कार विजेत्यांची भूमिका समजून घेत आहे 
लॉकडाउनच्या आधीच आम्ही अनेक सामाजिक संस्थांना सोबत घेऊन गरजूंसाठी अन्नधान्याची व्यवस्था केली. सुमारे अडीच हजार लोकांपर्यंत मदत पोहोचविली. अडकलेल्यांसाठीही झटत आहोत. सध्या युव्हाल नोआ हरारी यांची "होमो सेपियन्स', "होमो डेअस' ही पुस्तके पुन्हा वाचत आहे. नरहर कुरुंदकर यांचे सर्व खंडही वाचत आहे. जगभरातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची भाषणे वाचत आहे. पुरस्कार स्वीकारतेवेळी वेळी त्यांनी काय मांडणी केली, कोणती भूमिका स्वीकारली, हे समजून घेत आहे. दुर्बल घटकांना जास्त झळ पोहोचत आहे. त्यांचे भविष्य काय, हा प्रश्‍न अस्वस्थ करीत आहे. 
-सायमन मार्टिन, 
कवी, वसई 
 

...जखमी अवयवांची काळजी करतो 
एखादी थंडगार सुरी सर्वांगावरून फिरावी; पण ती अदृश्‍य असावी, असा माझ्यासारख्याचा अनुभव आहे. तसे रोजचे नीट सुरू आहे. म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी जेवण, विश्रांती आणि रात्री झोप. पुस्तके आहेत. इंटरनेट आहे. सगळे आहे. अचानक धनलाभ व्हावा, तसे अचानक निवांत मोकळा वेळ मिळाला म्हणून मी पुस्तक घेतो हातात; पण मिटवून ठेवून देतो. कारण, त्या थंडगार सुरीचा स्पर्श आता थेट मेंदूतच जाणवतो. हो सोबतीला टीव्ही आहे. पण, टीव्हीवर ती माणसं दिसतात कंटेनरमध्ये कोंबलेली. बायकोमुलांना घेऊन रानावनातून पायपीट करणारी. ज्यांच्यासाठी या क्षणाला आज फक्त भूक आहे. त्यापुढे मृत्यूही दुय्यम ठरावा. या अशा अस्वस्थ काळात माझ्यासारखा मध्यमवर्गीय माणूस आपल्याच शरीराच्या जखमी अवयवाची काळजी करतो, त्या स्वार्थाने स्वतःपलीकडे पाहतो, हेच एक वास्तव या काळातील सांगण्यासारखे, बाकी काही नाही. 
-प्रमोद मुनघाटे, 
लेखक, समीक्षक, नागपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com