Video :ऐकावे ते नवलच! बोकड देतोय चक्क दूध

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

चार दिवसापूर्वी या बोकडास आंघोळ घालीत असतांना बोकडाच्या इवलाश्या स्तनातून दूध निघत असल्याचे निदर्शनास आले. बोकड मालकाने दूध काढण्याचा प्रयत्न केला बोकडाने चक्क पहिल्याच दिवशी ग्लासभर दूध दिल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली. तेव्हापासून दररोज दुध काढण्याचा क्रम सुरू आहे.

मारेगाव (जि. यवतमाळ) : मारेगाव तालुक्यातील वेगाव नजीक आणि वणी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या डोंगरगाव येथील शेतकऱ्याचा पाळीव बोकड चक्क दूध देतो आहे. पंचक्रोशीत या निसर्गाच्या किमयेची चर्चा आहे. 'बोकड दूध देतोय' हा कुतूहलाचा अन आश्चर्याचा विषय आहे. हा अजूबा बोकड आता बघणाऱ्यांची गर्दी खेचत आहे.

 

मारेगाव -वणी तालुक्याच्या मध्ये असलेल्या डोंगरगाव येथे  हा निसर्गाचा चमत्कार झाला आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी रामकृष्ण नागो मेश्राम शेतीसह शेळी पालनाचा पूरक व्यवसाय करतात. या शेळी कळपातील दोन वर्षांच्या बोकडाला उन्हाळ्याचे तापमानामुळे सायंकाळी आंघोळ करून देण्याचा नित्यक्रम आहे.चार दिवसापूर्वी या बोकडास आंघोळ घालीत असतांना बोकडाच्या इवलाश्या स्तनातून दूध निघत असल्याचे निदर्शनास आले. बोकड मालकाने दूध काढण्याचा प्रयत्न केला बोकडाने चक्क पहिल्याच दिवशी ग्लासभर दूध दिल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली.

तेव्हापासून दररोज दुध काढण्याचा क्रम सुरू आहे. कमी जास्त प्रमाणात हा बोकड दुध देत असल्याने त्याला बघण्यासाठी अनेकजण गर्दी करीत आहेत. हा बोकड दूध देत असल्याने आम्हास जोर का झटका ....बसल्याचे बोकड मालक सांगतो आहे.

 सविस्तर वाचा - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला झाला लॉकडाउनचा फायदा..
 बोकडाच्या शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे हा बोकड दूध देत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाचशे लोकवस्ती असलेल्या डोंगरगाव येथील  बोकडाचे दूध देणे कुतुहलाचा विषय ठरत आहे.  गाय, शेळी ,म्हैस या मादीे दूध देतात मात्र डोंगरगावचा हा अजूबा बोकड दूध देऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  पशुसंवर्धन अधिका-यांशी या विषयी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OMG! A milk giving buck