जिल्हाधिकारी म्हणाले, बेड मिळत नसेल तर संपर्क साधा

नीलेश डोये
Thursday, 8 April 2021

रेमडीसीव्हर औषधाच्या साठ्याची माहिती घेण्यात येत असून मेडिकल स्टोअर्समधून रेमडीसीव्हरवर विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता पुरवठादार थेट हॉस्पिटलला व हॉस्पिटल संबंधित मेडिकल स्टोअर्सलाच पुरवठा करणार आहे.

नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तेथील नागरिकांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची (कॉल सेंटर) निर्मिती करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

समन्वय कक्षातील संपर्क क्रमांक ०७१२- २५६२६६८ असून १०७७ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी केले. समन्वय कक्षातील या क्रमांकावर नागरिकांना चोवीस तास संपर्क करता येऊ शकेल असे ते म्हणाले. जिल्ह्यात ऑक्सिजन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तुटवड्याची कोणतीही तक्रार नाही. जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादनांखेरीज भिलाई स्टील प्लॉन्टवरून देखील पुरवठा होत असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.

महत्त्वाची बातमी - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज

रेमडीसीव्हर औषधाच्या साठ्याची माहिती घेण्यात येत असून मेडिकल स्टोअर्समधून रेमडीसीव्हरवर विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता पुरवठादार थेट हॉस्पिटलला व हॉस्पिटल संबंधित मेडिकल स्टोअर्सलाच पुरवठा करणार आहे. खासगी रूग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची तपासणी, अन्न व औषध प्रशासन विभागातील चमूमार्फत करण्यात येणार आहे. तसेच चाचण्यांच्या संख्येचे अपलोडिंग व देयक तफावतीतील अपप्रकारांची देखील शहानिशा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सहा मिनिटाची स्वतः करा चाचणी

ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी लक्षणे जाणवताच वेळ न घालवता उपचार सुरू करावे. गावात आशा व अंगणवाडी सेविकेमार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. कोरोनासाठी वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ६ मिनीट चालण्याची जलद चाचणी करता येईल. त्यात चालण्यापूर्वी केलेली एखाद्या व्यक्तीची ऑक्सिजन (प्राणवायू) पातळी व चालल्यानंतरची प्राणवायू पातळी यात जर ४ पेक्षा जास्त फरक असेल तर ते गंभीर आहे. ताप, सर्दी, खोकला, असल्यास वेळकाढूपणा न करता लवकर वैद्यकीय उपचार सुरू करण्याचे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the bed is not available contact the collector said