‘चॅलेंज’ स्वीकारत असाल तर सावधान!  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सायबर गुन्हेगार हे तुमचे फोटो हे फोटोशॉपमध्ये एडिट करून हव्या त्या ठिकाणी वापरू शकतात. त्यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या चेहऱ्याने तुम्हाला फेक अकाउंटशी सामना करावा लागतो. एवढंच नाही, तर तुमच्या फोटोचा कुठेही कसाही वापर होऊ शकतो.

‘चॅलेंज’ स्वीकारत असाल तर सावधान! 

टाकळघाट (नागपूर) : सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या ‘कपल चॅलेंज’ हॅशटॅगने धुमाकूळ घातला आहे. परंतु, ‘चॅलेंज’ स्वीकारून स्वतःचे व कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत असाल तर सावधान व्हा; कारण तुम्ही अपलोड केलेल्या फोटोचा सायबर गुन्हेगार गैरवापर करू शकतात. एखाद्याचे संसार उद्ध्वस्त होऊ शकते. 

कपल चॅलेंज, सिंगल चॅलेंज, खाकी चॅलेंज, फॅमिली चॅलेंज अशा वेगवेगळ्या ‘चॅलेंज’च्या नावावर सोशल मीडियावर आपले व कुंटुबीयांसमवेत फोटो अपलोड केले जात असल्याने सायबर गुन्हेगार याचा गैरवापर करून तुमच्या भावी जीवनात अडथळा तयार करू शकतात. अशा प्रकारच्या विविध घटना याअगोदर घडल्या असल्याने आपण यापासून सावध राहिलेले कधीही चांगले. 

काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या ‘चॅलेंज’च्या नावाखाली आपला व परिवारासोबत असलेल्या फोटोला सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या ट्रेंडने जास्तच जोर धरला आहे. त्याला अनेकांची पसंती मिळत असल्याने आकर्षक वेशभूषा करून फोटो अपलोड केले जात आहेत. हे चॅलेंज आपल्याला स्वीकारायचे असल्याने या नादात ते धोक्याला निमंत्रण देत आहेत. 

महत्त्वाचे म्हणजे, सोशल मीडियावर फोटो अपलोड करतेवेळी #couplechallenge असा हॅशटॅग देण्यात येतो. त्यावर सर्च केले की, कपल चॅलेंज नावावर हजारो दाम्पत्यांचे सर्व फोटो दिसतात. सायबर गुन्हेगार हे तुमचे फोटो हे फोटोशॉपमध्ये एडिट करून हव्या त्या ठिकाणी वापरू शकतात. त्यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या चेहऱ्याने तुम्हाला फेक अकाउंटशी सामना करावा लागतो. एवढंच नाही, तर तुमच्या फोटोचा कुठेही कसाही वापर होऊ शकतो. फेक अकाउंट असेल किंवा पोर्न साइटसवरसुद्धा हे फोटो वापरण्यात आलेले आहे. असे अनेक गुन्हे याआधीही घडले आहेत. 

हेही वाचा : मेळघाटात आलाय नवा पाहुणा! पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी 

पोलिसांकडे तक्रार करा 
नागरिकांनी कोणत्याही ‘चॅलेंज’च्या नादात पडू नये. कोणीही आपले वैयक्तिक, पत्नी, मुलगा-मुलगी, कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकू नये. यामुळे अप्रिय घटना घडलेल्या आहेत. एखादा सायबर गुन्हेगार यासंदर्भात ब्लॅकमेल करत असल्यास नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 
 

सोशल मीडियासंबंधित अकाउंटला सोपा पासवर्ड ठेवू नये. फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. स्वतःचा मोबाईल नंबर टाकायला नकोच. त्यामुळे हॅकरला अकाउंट हॅक करणे सोपे जाते. 
-जावेद शेख, उपनिरीक्षक, सायबर क्राइम, नागपूर

संपादन : मेघराज मेश्राम

loading image
go to top