ग्राहकांनो, आतातरी सावध व्हा, दारावर सिलिंडरचे वजन करा

राजेश प्रायकर
Saturday, 6 March 2021

निर्धारित वजनापेक्षा सिलिंडर कमी वजनाचे मिळत असल्याकडेही अन्न पुरवठा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. ग्राहकांना सिलिंडरचे वजन करून देणे बंधनकारक आहे, असे नमुद करीत सवाई यांनी वजन होत नसेल तर ग्राहकांनी तक्रार करावी, असे आवाहन केले.

नागपूर : सध्या सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या असून सामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजनच बिघडले आहे. त्यातही गॅस सिलिंडर वितरकांकडून कमी प्रमाणात गॅस देण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न वितरण अधिकारी अनिल सवाई यांनी गॅस वितरकांच्या प्रतिनिधीकडून दारावर सिलिंडरचे वजन करून मिळत नसेल तर तक्रार करा, असे आवाहन केले आहे.

नुकतीच सिव्हिल लाइन्स येथील अन्न पुरवठा कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी सिलिंडरबाबत मुद्दे उपस्थित केले. ऑनलाइन बुकिंगनंतरही सिलिंडर वेळेत घरी पोहोचत नाही. वारंवार गॅस वितरकांच्या कार्यालयात फोन करावे लागत असल्याकडे ग्राहक पंचायतने लक्ष वेधले. ग्राहकाने थेट गॅस गोडावूनमधून सिलिंडर आणल्यास २७ रुपये कमी करणे अपेक्षित आहे. परंतु, ग्राहकांकडून घरी आणून देणाऱ्या सिलिंडरचे दर आकारून लूट केली जात असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी - पाचही जिल्हा परिषदेतील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द, नव्याने निवडणूक घेण्याचे आयोगाचे आदेश

निर्धारित वजनापेक्षा सिलिंडर कमी वजनाचे मिळत असल्याकडेही अन्न पुरवठा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. ग्राहकांना सिलिंडरचे वजन करून देणे बंधनकारक आहे, असे नमुद करीत सवाई यांनी वजन होत नसेल तर ग्राहकांनी तक्रार करावी, असे आवाहन केले.

बैठकीत सहायक अन्न वितरण अधिकारी नीलेश पाटील, इंडियन ऑइल कार्पोरेशनचे विक्री व्यवस्थापक निर्मल माहेश्वरी, हिंदुस्थान पेट्रोलियमचे सहायक विक्री व्यवस्थापक सचिनकुमार, विभागीय विक्री व्यवस्थापक पंकज अंबीलढगे, भारत पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक सौरभ मिश्रा तसेच अ. भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे, प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, जिल्हा संघटनमंत्री गणेश शिरोळे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कठाळे, महानगर अध्यक्ष अनिरुध्द गुप्ते, सचिव उदय दिवे उपस्थित होते.

जाणून घ्या - अरे वाह! आता WhatsApp Web वरून करा व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स; जाणून घ्या नवीन फीचरबद्दल

सिलिंडर गोडावूनमध्ये सुरक्षेचे उपाय

मुंबई येथे शहरातील गॅस सिलिंडर गोदामाला आग लागून ३६ स्फोट झाले होते. यात मोठी जीवित व वित्तहानी झाली होती. या पार्श्वभूमीवर वस्तीतील गॅस गोदामाकडे ग्राहक पंचायतने लक्ष वेधले. भरवस्तीतील गॅस सिलिंडर गोदामात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्या, असे निर्देश सवाई यांनी पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you cant get the cylinder by weighing it on the door complain