अस्सल नागपुरी 'दिमाग'; घरातच उघडले चक्क पेट्रोल पंप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

पेट्रोल हे जीवनावश्‍यक घटक झाले आहे. प्रत्येकजण जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्या वाहणाचा वापर करीत असल्याने पेट्रोलची मागणी वाढत आहे. यामुळे पेट्रोल महाग होत असून, जीवनावश्‍यक वस्तू महाग होत आहेत. पेट्रोलचे रेट वाढल्यास सर्व वस्तूंच्या किमती वाढतात. खेड्यांमध्ये पेट्रोलची साठवणूक करून ब्लॅकमध्ये विक्री केली जाते.

नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे देशाअंतर्गत इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना पुन्हा एकदा इंधन वाढीचे चटके बसणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी पेट्रोलची साठवणूक करून ब्लॅकमध्ये विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. असाच एक प्रकार नागपुरात नुकताच उघडकीस आला आहे. 

पेट्रोल हे जीवनावश्‍यक घटक झाले आहे. प्रत्येकजण जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्या वाहणाचा वापर करीत असल्याने पेट्रोलची मागणी वाढत आहे. यामुळे पेट्रोल महाग होत असून, जीवनावश्‍यक वस्तू महाग होत आहेत. पेट्रोलचे रेट वाढल्यास सर्व वस्तूंच्या किमती वाढतात. खेड्यांमध्ये पेट्रोलची साठवणूक करून ब्लॅकमध्ये विक्री केली जाते. असाच प्रकार नागपुरातील कपिलनगरात उघडकीस आला आहे. पेट्रोलचा साठा करून अवैध विक्री करणारा अकबर नवास अली सय्यद (48, रा. तेगिया कॉलनी, टायर चौक) याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून 6,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

अवश्य वाचा - मजूर काचा घेऊन बांबूवर चढला अन्‌ वाहिनीवर कोसळला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलनगरचे पोलिस कर्मचारी प्रवीण मराप्पे हे पथकासह पॅट्रोलिंग करीत असताना टायर चौकातील तेगिया कॉलनीत अकबर नावाचा युवक अवैध पेट्रोल विकतो, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाडीची योजना आखून पथक घटनास्थळी गेले. त्यावेळी एक मुलगा हातात पेट्रोलची बाटली घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्या मुलाला थांबवून पेट्रोल कुठून आणले अशी विचारणा केली असता त्याने एका घराकडे बोट दाखविले. 

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अकबर हा वऱ्हांड्यात बसलेला दिसला. पोलिसांनी घरझडती घेतली असता दोन प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये 55 लीटर पेट्रोल, सहा रिकाम्या कॅन, पेट्रोल काढण्याची नळी असा 6,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी कलम 3, 7 जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम 1955, सहकलम 285 भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून अकबरला अटक केली.

अधिक वाचा - तो पंचावन वर्षांचा ती नऊ वर्षांची अन्...

दुचाकीतून काढायचा पेट्रोल

पोलिसांनी अकबरची विचारपूस केली असता दुचाकीमध्ये पेट्रोल भरून तो आणायचा. त्यानंतर कॅनमध्ये पेट्रोल काढून विक्री करायचा असे त्याने सांगितले. परंतु, त्याच्या सांगण्यावर पोलिसांचा विश्‍वास नसून पेट्रोलच्या टॅंकरमधून पेट्रोल काढून तो विकत असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. 

कुटुंब आगेच्या भडक्‍यावर

घरात जवळपास 50 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल जमा होते. अतिशय ज्वलनशील असलेल्या पेट्रोलचा केव्हाही भडका उडू शकतो. त्यामुळे अख्खे कुटुंब आगेच्या भडक्‍यावर होते. चुकून अगरबत्ती किंवा माचीसची काडी लागल्यास संपूर्ण कुटुंबांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, दोन पैसे जास्त कमविण्यासाठी स्वतःसह कुटुंबीयांच्या जीवाशी खेळ सुरू होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal sale of petrol in Nagpur