आता शासनानेच चालवावी आमची खासगी रुग्णालये

केवल जीवनतारे
Wednesday, 16 September 2020

डॉक्टरांसाठी किट आणि मास्क आणि रुग्णालयांद्वारे वापरल्या जाणाऱ्या मास्क, ऑक्सिजनचे दर केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमी केली जाणार होती. एक सप्टेंबरपूर्वी झालेल्या बैठकीतील या निर्णयावर सरकार ठाम राहिले नाही. सरकारने ३१ ऑगस्ट २०२० रोजी नवीन दर जाहीर केले.

नागपूर : कोविडच्या काळात खासगी रुग्णालयांचा खर्च वाढला आहे, परंतु सरकारने दर आकारून दिले आहेत. यामुळे खासगी रुग्णालये चालविणे कठीण होऊन बसले. सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनसह राज्यातील खासगी डॉक्टरांच्या विविध संघटना एकवटल्या आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तर यापुढे शासनानेच सर्व खासगी रुग्णालये चालवावी असे थेट बोल आयएमएने सुनावले आहे. 

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा -

विविध कारणांमुळे सुमारे अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शासनासोबत झालेल्या पहिल्या बैठकीत अतिदक्षता विभागाचे दर वाढवून देण्यासोबतच बायोमेडिकल वेस्ट तसेच वीज बिलांमध्ये सवलत देण्यात येईल, पीपीईचे दर रोखण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते. डॉक्टरांसाठी किट आणि मास्क आणि रुग्णालयांद्वारे वापरल्या जाणाऱ्या मास्क, ऑक्सिजनचे दर केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमी केली जाणार होती. एक सप्टेंबरपूर्वी झालेल्या बैठकीतील या निर्णयावर सरकार ठाम राहिले नाही. सरकारने ३१ ऑगस्ट २०२० रोजी नवीन दर जाहीर केले. आयएमएने ४ सप्टेंबर रोजी आणीबाणीच्या राज्य परिषदेच्या बैठकीत शासनाच्या या सूचनेचा निषेध केला आणि शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले. 

असे करण्यात आले आंदोलन 
-१० सप्टेंबरला आयएमएच्या शाखांतर्फे जिल्हाधिकारी, तालुका अधिकारी यांना निवेदन 
-११ सप्टेंबरला आयएमए सदस्यांनी मेडिकल कौन्सिलच्या प्रती जाळत निषेध केला 
-१५ सप्टेंबरला मालकांनी रुग्णालयाच्या नोंदणीच्या प्रती आयएमए शाखेत सादर केल्या 

अशा आहेत मागण्या
-हॉस्पिटल्सना न परवडणारे दर लादू नका 
-आयएमएसोबत चर्चा करून परवडणारे दर जाहीर करा
-कोविड हॉस्पिटल्सप्रमाणे नॉन-कोविड हॉस्पिटल्सवर ऑडिटर बसवू नये 
-डॉक्टरांना प्रमाणित दर्जाचे पीपीई किट्स, मास्क माफक दराक उपलब्ध करा 
- डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण द्या 
-कायद्याच्या धाक देऊन डॉक्टरांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊ नका
-महात्मा फुले जनारोग्य योजनेतील सहा महिन्यांची थकबाकी द्या.
-राज्यपालांच्या आदेशप्रमाणे आयएमएसोबतच्या राज्य आणि जिल्हा समन्वय समितीच्या बैठका बोलवा.
-खासगी डॉक्टरांच्या ५० लाखांच्या विम्याचे आश्वासन लाल फितीतून सोडवा.

 
शासनाच्या विरोधात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि यांच्यासोबतच दंतचिकित्सक एकवटले आहेत. या सर्व संघटनांनी आयएमएच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. शासनाने आपला निर्णय मागे न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर अनिश्चितकाळासाठी काम करणे थांबवतील. 
-डॉ. अविनाश भोंडवे,अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन,महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMA to ask Govt. to run All Private Hospitals