'चाची 420'च्या अटकेसाठी भंडारा पोलिसांच्या हालचाली, काय आहे प्रकरण?

अनिल कांबळे
गुरुवार, 25 जून 2020

प्रीतीने भरोसा सेलच्या नावाखाली एका व्यक्तीला धमकावून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करवून घेण्यासाठी 25 हजार उकळले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 हजार रुपये जप्त केले आहे. उर्वरित पैशांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तिची पोलिस कोठडी वाढवून मागितली.

नागपूर : चाची 420 प्रीती दासच्या अटकेसाठी भंडारा पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच पोलिस तिला अटक करणार असल्याची माहिती आहे. भंडारा येथील एका प्रकरणात प्रीती ही फरार आहे. दरम्यान, पोलिस कोठडी संपल्याने गुन्हेशाखा पोलिसांनी प्रीतीला बुधवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली आहे. 

पाचपावली, जरीपटका, लकडगंज आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यात प्रीती दासविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. गुन्हे शाखेकडेही तिच्याविरुद्धच्या तक्रारींचा ओघ सुरूच आहे. जरीपटका पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध एकाला 25 हजारांनी लुबाडण्याचा गुन्हा दाखल आहे.

अधिक वाचा - पतीसोबत अश्‍लील वर्तन करण्यास बाध्य केले; नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

प्रीतीने भरोसा सेलच्या नावाखाली एका व्यक्तीला धमकावून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करवून घेण्यासाठी 25 हजार उकळले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 हजार रुपये जप्त केले आहे. उर्वरित पैशांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तिची पोलिस कोठडी वाढवून मागितली. यामुळे न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. 

पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा

बुधवारी गुन्हेशाखा पोलिसांनी प्रीतीची कसून चौकशी केली. पोलिसांनी तिच्याशी संबंधित व्यक्तींचीही चौकशी केली. मात्र, पोलिसांना ठोस माहिती मिळू शकली नाही. प्रीती दास प्रकरणात एका पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा विभागात आहे. प्रीतीविरुद्ध आतापर्यंत फसवणूक व खंडणीचे एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत.

सविस्तर वाचा - मला स्पोर्ट कोट्यातून नोकरी लागली असून पुणे वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे, तू फक्त...

पोलिस कोठडीत वाढ

'लुटेरी दुल्हन' नावाने ओळखली जाणारी ठगबाज प्रीती दास हिला गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले. न्यायालयाने तिला आणखी एका दिवसाची पोलिस कोठडी वाढवून मिळाली. तिने लुबाडलेले पैसे शोधण्यासाठी ही पोलिस कोठडी वाढवून मिळाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in police custody of Preeti Das