चिंताजनक...शाहिरांच्या माहेरघराची ओळख पुसली जाणार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

कोरोनामुळे बसलेल्या फटक्‍यामुळे एका मंडळाचे तब्बल दहा लाखांचे नुकसान झाले असल्याची खंत व्यक्‍त करताना माणिकराव शाहीर यांनी आतातरी राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी याचना केली आहे.

नागपूर : शाहिरांचे माहेरघर म्हणून असलेली विदर्भाची ओळख आता पुसली जाण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे गत काही महिन्यांपासून पडून असलेली विदर्भातील शाहिरांच्या यादीचे काय झाले, असा प्रश्‍न स्थानिक शाहीर मंडळातील सदस्य विचारत आहेत. 

शाहिरी डफ गर्जायला लागला की, अगदी नसानसांत स्फुरण चढते. शाहीर हा केवळ लावणी-पोवाडे गाऊन मनोरंजन करणारा कलावंत नसतो, तर तो आपल्या कलेद्वारे समाजाचे प्रबोधन करतो. कोरोनाच्या संकटामुळे अशा समाजप्रबोधनकारांच्या आयुष्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडीगंमत, शाहिरी व लावणी पथकांसाठी वर्षाला 42 लाखांचा निधी राखीव आहे.

मात्र, हा निधी विदर्भाच्या वाट्याला किती आला, हादेखील गंभीर प्रश्‍न आहे. काही महिन्यांपूर्वी जनजागृती कलंगी शाहीर मंडळाचे प्रमुख माणिकराव देशमुख (शाहीर) यांच्या मार्गदर्शनात विदर्भात दीडशे मंडळांची नोंद करण्यात आली. पुढे हे निवेदन राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडेदेखील सोपविण्यात आले. मात्र, त्यांचे अद्याप काहीच उत्तर आले नसल्याची माहिती माणिकराव देशमुख यांनी दिली. 

हेही वाचा : टोळधाड आल्याचे समजताच गृहमंत्री रात्रीच शेतकऱ्यांच्या बांधावर

नागपुरात अशी पन्नास मंडळे आहेत. एका मंडळात साधारणत: दहा कलाकार असतात. अर्थात, सुमारे पाचशे कुटुंबांचा उदरनिर्वाह शाहिरीच्या भरवशावर चालतो. कोरोनामुळे बसलेल्या फटक्‍यामुळे एका मंडळाचे तब्बल दहा लाखांचे नुकसान झाले असल्याची खंत व्यक्‍त करताना माणिकराव शाहीर यांनी आतातरी राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी याचना केली आहे. 1968पासून प्रारंभ झालेल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चढउतार बघितले. मात्र, आजवरच्या प्रवासातले सर्वांत मोठे नुकसान कोरोनाने केले असल्याचे माणिकराव देशमुख म्हणाले. 

काहीच मिळाले नाही 
सरकार दरबारी दाद मिळत नसल्याने पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व समाजकल्याण विभागालादेखील शाहिरी मंडळांनी निवेदन दिलेले आहे. मात्र, समाजाच्या जागृतीचे महत्कार्य करणाऱ्या शाहिरांना आश्‍वासनाव्यतिरिक्‍त काहीच मिळाले नसल्याचे माणिकराव देशमुख म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injustice on the Shahir of Vidarbha