
पोलिसांनी एका व्हॅनवर संगीत वाद्य आणि संच तसेच गायकासाठी स्टेज उभारला होता. मोठमोठी स्पिकर्सच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत नागपूर पोलिसांकडून आवाहन, संदेश, सूचना प्रसारित करण्यात येत होत्या.
नागपूर : कोरोनाच्या लढाईत सामान्य नागरिकांना प्रत्यक्षपणे सहभागी होता येत नसले तरी पोलिस आणि वैद्यकीय विभागातील कर्मचारी ती लढाई लढत आहेत. मात्र, तुम्हालाही या लढ्यात सहभागी व्हायचे असेल तर फक्त तुम्ही घरी रहा. तुम्ही घरात बोअर झाले असाल तर आम्ही तुमचे मनोरंजनसुद्धा करू, असा संदेश देत नागपूर पोलिसांनी एक अभिनव उपक्रम नागपूरकरांसाठी आखला आहे. यामध्ये हिंदी चित्रपटातील गाजलेली गाणी आणि देशभक्तीपर गितांचा नजराणा पोलिसांकडून नागरिकांसमोर आणला जात आहे. या उपक्रमाला शनिवारी व्हेरायटी चौकातून सुरुवात झाली.
पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम साळी यांच्या हस्ते व्हेरायटी चौकात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाला "तुम्ही राहावे घरी... मनोरंजन तुमच्या दारी' असे नाव देण्यात आले. विदर्भ कलाकार संघटनेने या उपक्रमाला सहकार्य केले आहे.
जाणून घ्या - आम्हा पती-पत्नीचा घटस्फोट; आईने दुसरे लग्न केल्याने झाले असावे असे!
पोलिसांनी एका व्हॅनवर संगीत वाद्य आणि संच तसेच गायकासाठी स्टेज उभारला होता. मोठमोठी स्पिकर्सच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत नागपूर पोलिसांकडून आवाहन, संदेश, सूचना प्रसारित करण्यात येत होत्या. त्यानंतर इंडियन आयडल फेम श्रीमती धनश्री बुरबुरे, राजेश बुरबुरे आणि वैभव बुरबुरे यांच्या अन्य काही गायकांनी आपल्या गितांचा नजराणा नागपूरवासीयांसाठी प्रस्तूत केला.
ही म्युझिक व्हॅन शहरातील अनेक भागात आणि चौकात फिरली आणि नागपूरकरांना साद घालत मनोरंजनसुद्धा केले. या उपक्रमाचे नियोजन वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त पराग पोटे, पोलिस निरीक्षक अजयकुमार मालविय, अतुल सबनिस, रोशन यादव, महेश चव्हाण, संदीप भोसले आणि मनोहर कोटनाके यांनी केले.
हेही वाचा - Video : साहेबऽऽ, लोक पैसे देतात अन् पूर्ण शरीराशी खेळतात, आज मात्र...
मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न
हा उपक्रम इंफोटेन्मेंट असून पोलिस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पत्रकार बांधव, सफाई कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आखण्यात आला आहे. मनोरंजनासह नागरिकांपर्यंत महत्त्वाच्या सूचना, पोलिसांचे आवाहन आणि संदेश पोहोचविण्यासाठी उपयुक्त आहे.
- विक्रम साळी,
पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.