पीक विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या जिवावर,  विमा देण्यास कंपनीचा नकार 

मनोहर बेले
Tuesday, 17 November 2020

पीक विमा कंपनीच्या सांगण्यावरून पिकाचे नुकसान हे धुक्यामुळे झाले आहे. त्यामुळे ते या विम्याच्या नियमात बसत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळू शकत नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

अंबाडा (जि. नागपूर): एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा करत आहे, परंतु असे होताना दिसत नाही. शासनाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा यासाठी गावोगावी दवंडी दिली. तसेच मोठ्या प्रमाणात याबाबत जाहिराती प्रकाशित केल्या. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. परंतु सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊनसुद्धा पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पीकविमा द्यायला तयार नाही. 

पीक विमा कंपनीच्या सांगण्यावरून पिकाचे नुकसान हे धुक्यामुळे झाले आहे. त्यामुळे ते या विम्याच्या नियमात बसत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळू शकत नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. लाखो शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून पीक विमा काढला.परंतु पीक विमा कंपनी विमा द्यायला तयार नसल्यामुळे कंपनी शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे. 

सविस्तर वाचा - बापरे! धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्याला सापडले सोने; लक्ष्मीपूजनाला तीन गावात दवंडी देऊन केले परत

पिकाचे नुकसान सततच्या पावसामुळे व रोगामुळे झाले आहे असे, कृषी विभागाने वारंवार सांगितले. पण कंपनी पीक विमा शेतकऱ्यांना द्यायला तयार नाही. त्यामुळे शासन व पीक विमा कंपनी यांच्यात साटेलोटे तर नाही ना, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाऊस व रोगामुळे झालेल्या पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासनाकडून कसल्याही हालचाली होत नसल्याचे एकंदर स्थितीवरून दिसून येते.

 विशेष म्हणजे जलालखेडा येथील शेतकरी दिलीप हिवरकर यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्याची तक्रार पीक विमा कंपनीकडे केली. कंपनीने त्यांना तुमच्या पिकाचे नुकसान हे धुक्यामुळे झाल्याचे एका पत्राद्वारे कळवले. त्यामुळे त्या शेतकऱ्याने माहितीच्या अधिकारात याबाबत कृषी विभागाला माहिती विचारली असता कृषी विभागाने सांगितले की पिकाचे नुकसान हे सततच्या पावसामुळे व रोगामुळे झाले आहे.

 कृषी विभागाने दिलेली माहिती सुद्धा पीक विमा कंपनी मानायला तयार नसल्यामुळे अशा या कंपनीवर वचक कोणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित याची दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा मिळून द्यावा, अशी मागणी होत आहे. 

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

गृहमंत्र्यांना देणार निवेदन 

विमा कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे व शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान सततच्या पावसामुळे व रोगामुळे झाला असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला असतानाही पीक विमा कंपनी पीक विमा द्यायला तयार नाही. त्यामुळे अशा या मनमानी करणाऱ्या कंपनीवर कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचे पैसे मिळावे, याकरिता १५ नोव्हेंबरला तालुक्यातील शेतकरी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देणार आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insurance companies are denying to give insurance to farmers