अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhushan Satai deth side story

शनिवारी लक्ष्मीपूजन होते. पण, फैलापुरा व आजूबाजूच्या परिसरात कुणीच साजरे केले नाही. भूषणचा परिसर अतिशय शोकाकुल आहे. भेटणाऱ्या मंडळींचा ओघ सतत सुरू आहे. शहीद भूषणच्या परिवारात आई मीरा, वडील रमेश सतई मोलमजुरी करणारे, तर बहीण सरिता खासगी कॉन्व्हेंटमध्ये नोकरीला आहे. सध्या कोरोनामुळे ‘जॉब’ बंदच आहे.

अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

काटोल (जि. नागपूर) : दिवाळीची पूर्वसंध्या नागपूर जिल्ह्यातील काटोलवासींसाठी अतिशय दुर्दैवी ठरली. जम्मू-काश्मीर येथे भारतभूमीच्या रक्षणासाठी काटोलच्या तरुणाला वीरमरण आले. शहीद भूषण रमेश सतई (वय २८, रा. फैलपुरा) यांचे मित्र रवी गुजर यांनी भरलेल्या डोळ्यांनी आपबिती सांगितली.

त्यांना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता मोबाईलवर दुःखद वार्ता कळली. मित्र सैनिक रिकू चरडे (जम्मू-काश्मीर) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. भयानक शॉक बसला. शब्द निघत नव्हते. कारण, सुद्धा तसेच. सर्व मंडळी एक महिना सोबत होते. शहीद भूषण ऑक्टोबरला एक महिन्याच्या सुटीवर काटोल येथे आला होता. येथेच त्याचा वाढदिवस मिळून सर्वांनी साजरा केला. भूषणच्या आठवणींनी सर्व जण शोकमग्न आहेत.

जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू

तीन ऑक्टोबरला भूषणचा वाढदिवस सर्व मित्रांनी मिळून साजरा केला. त्यावेळी लग्नाकरिता निरोप येत असल्याचे त्याने सांगितले. सोबत आई-वडिलांना धाकटी बहीण सरिता, भाऊ रोशन यांची जबाबदारी पार पाडायची असल्याचे तो बोलला. अकाली काळाने घाव घातल्याने भूषणचे सर्व स्वप्न हवेत विरले. हे सांगत असताना मित्र रवीचे शब्द अडखळत होते. ही वार्ता कळताच दोन दिवसांपासून सर्व मंडळी शोकमग्न आहे.

शनिवारी लक्ष्मीपूजन होते. पण, फैलापुरा व आजूबाजूच्या परिसरात कुणीच साजरे केले नाही. भूषणचा परिसर अतिशय शोकाकुल आहे. भेटणाऱ्या मंडळींचा ओघ सतत सुरू आहे. शहीद भूषणच्या परिवारात आई मीरा, वडील रमेश सतई मोलमजुरी करणारे, तर बहीण सरिता खासगी कॉन्व्हेंटमध्ये नोकरीला आहे. सध्या कोरोनामुळे ‘जॉब’ बंदच आहे. भाऊ रोशन पदवीधर व पोलिस भरतीसाठी तयारी करीत आहे. संपूर्ण परिवाराची जबाबदारी शहीद भूषणवर होती. त्याचे परिवाराला पुढे नेण्याचे स्वप्न घटनेमुळे अधुरे राहले आहे.

अधिक माहितीसाठी - खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

अंतिम दर्शन घेता येणार

सोमवारी काटोल येथे शहीद भूषणचे पार्थिव निवास परिसर न. प. भवन फैलापुरा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष रत्नाकर ठाकरे यांनी दिली. यादरम्यान बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे. सामाजिक, क्रीडा, महिला आदी संघटना अंत्ययात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. अंतिम यात्रा तार बाजार, डॉ आंबेडकर चौक, मुख्य मार्ग आयुडीपी ग्रामीण रुग्णालय येथून जाईल. न. प. जागेत शहीद भूषणवर संपूर्ण शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याचे काटोल पोलिस कार्यालयाचे सुनील कोकाटे यांनी सांगितले.

हवाई दलाच्या विशेष विमानाने पार्थिव नागपुरात

शहीद सतई काटोलचे असून, त्यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले. भारतीय लष्कराच्या विशेष दलाने सन्मानपूर्वक स्वीकारले. यावेळी विमानतळावर भारतीय वायूदलाचे ग्रुप कॅप्टन कांचनकुमार, एनसीसी कामठीचे कर्नल व बायर लॅप्टनंन कर्नल धनाजी देसाई, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी वसंत कुमार पांडे आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचा - ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू

वर्षभरापासून पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये होती

शहीद भूषण रमेश सतई यांच्या पार्थिवावर कामठी येथील संरक्षण विभागाच्या हॉस्पिटल परिसरात विशेष मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी काटोल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शहीद भूषण सतई सहा मराठा बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होते. भारतीय सेनेमध्ये निवड झाल्यानंतर मराठा बटालियनमध्ये रुजू झाले. वर्षभरापासून त्यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये होती. ते फैलपुरा काटोल येथे राहत असून, त्यांच्यामागे वडील रमेश धोंडूजी सतई, आई सरिता सतई, लहान भाऊ लेखनदास सतई व बहीण असा परिवार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे