
शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी राजवाडा पॅलेस येथे बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत सोले आणि जोशी दिसत नसल्याने एका आमदाराने ते बैठकीला आले का नाही असा प्रश्न उपस्थित केला.
नागपूर ः महापौरांच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीला माजी आमदार अनिल सोले आणि माजी महापौर संदीप जोशी अनुपस्थित राहिल्याने पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपात अंतर्गत धुसफूस वाढल्याचे दिसून येते.
शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी राजवाडा पॅलेस येथे बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत सोले आणि जोशी दिसत नसल्याने एका आमदाराने ते बैठकीला आले का नाही असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे बैठकीत चुळबूळ सुरू झाली. ते नाराज आहेत का, असेल तर त्यांना बैठकीला आणण्याची जबाबदारी कोणाची असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले.
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तो कशामुळे झाला याची अनेक कारणे दिली जात आहे. याचे प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने सिंहावलोकन करीत आहे. भाजप उमेदवाराला मतदान केल्यानंतर मतपत्रिकेवर चित्र, चिन्ह काढून अनेकांनी मुद्दामच मत अवैध केल्याचेही प्रकार निदर्शनास आले आहे. ही नाराजी कोणावर भाजप, उमेदवार की नेतृत्वावर अशीही विचारणा केली जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने बघत आहे.
शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये उघडपणे कधीही नाराजी व्यक्त केली जात नव्हती. पक्षाचा निर्णय अंतिम मानला जात होता. याच करणामुळे राज्यात आणि केंद्रात सत्ता नसतानाही सुमारे साठ वर्षे पदवीधर निवडणुकीत भाजप कधीच पराभूत झाली नाही. यावेळी केंद्रात सत्ता होती. पाच वर्षे राज्यात भाजपचीच सत्ता होती. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे तगडे नेते नेते विदर्भात होते. ते प्रचारातसुद्धा सहभागी झाले होते.
पुनर्बांधणी करावी लागणार
सर्व परिस्थिती अनकूल असताना जोशी यांचा पराभव भाजपला जास्तच छळत आहे. कार्यकर्ते हातबाहेर चालले असल्याने भाजपलाही आता पुनर्बांधणी करावी लागणार आहे. अन्यथा भाजप ‘काँग्रेस' व्हायला वेळ लागणार नाही, असे भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ