शुभांगी राऊत
शुभांगी राऊत

लॉकडाउनमुळे वडीलांच्या अद्रक, लिंबु विक्रीला बसला फटका, आंतरराष्ट्रीय ज्यूदोपटूचा परिवार करीत आहे जगण्यासाठी संघर्ष

नागपूर : ज्यूदो हा तसा दुर्लक्षित खेळ. पैसा व ग्लॅमर नसल्यामुळे यात सहसा करिअर करण्याची कुणीही हिंमत करीत नाही. मात्र, राऊत परिवारातील तीन मुलींनी हा धोका पत्करला. एकीने आंतरराष्ट्रीयस्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले, तर अन्य दोघींनी राष्ट्रीयस्तरावर नाव कमावले. वडिलांनी रस्त्यावर लिंबू, अद्रक व लसूण विकून त्यांना घडविले, "चॅम्पियन' बनविले. मात्र, लॉकडाउनमुळे सध्या पित्याचा व्यवसाय बंद पडल्यामुळे राऊत परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. या अडचणीच्या काळात परिवाराला समाजाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.


सोमवारी क्‍वार्टर येथे राहणारे सुभाष राऊत यांची आर्थिक परिस्थिती अगदीच जेमतेम. त्यांना प्रणाली, शुभांगी व कल्याणी या तीन मुली. तिघींनाही खेळांचे वेड असल्यामुळे वडिलांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. वेळप्रसंगी उपाशी राहून त्यांचे क्रीडाप्रेम जपले. मुलींना संकटाच्या प्रसंगी स्वत:चे रक्षण करता यावे तसेच त्यांना नोकरी मिळून त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्या, या उद्देशाने वडिलांनी तिघींनाही ज्यूदोमध्ये टाकले होते. थोरलीने (प्रणाली) ज्यूदोसह कुस्ती व कबड्डी या तीन खेळांमध्ये चमक दाखवित आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. तर धाकटीने (कल्याणी) राष्ट्रीयस्तरावर रौप्यपदक जिंकले. मधल्या शुभांगीने एक पाऊल पुढे टाकत थेट आंतरराष्ट्रीयस्तरावर झेप घेतली.

सुरुवातीला पुरुषोत्तम चौधरी व सध्या मुकुंद डांगे यांच्या प्रशिक्षणाखाली ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षक महाविद्यालयात सराव करणाऱ्या 21 वर्षीय शुभांगीने गुवाहाटी व ओडिशा येथे झालेल्या "खेलो इंडिया' क्रीडा महोत्सवात रौप्यपदके जिंकली. शिवाय दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेतही तिने ब्रॉंझपदकाची कमाई केली. राष्ट्रीयस्तरावरील चमकदार कामगिरीनंतर 2016 मध्ये कोची (केरळ) येथे झालेल्या आशियाई ज्यूदो स्पर्धेत तिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दुर्दैवाने या स्पर्धेत शुभांगीला पदक जिंकता आले नाही. भविष्यात पुन्हा संधी मिळाल्यास नक्‍कीच देशाला पदक मिळवून देईल, असा तिने विश्‍वास व्यक्‍त केला. एस. बी. सिटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या शुभांगीची पतियाळा येथील राष्ट्रीय शिबिरासाठीही निवड झाली आहे. मात्र, अभ्यासामुळे ती शिबिराला जाऊ शकली नाही.

शुभांगीच्या वडिलांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. तिच्या वडिलांचे बुधवार बाजारात लिंबू, अद्रक व लसूणविक्रीचे छोटेचे दुकान आहे. कधी वडील, तर कधी आई सुरेखा दुकानावर बसते. सध्या लॉकडाउनमुळे कमाईच बंद आहे. त्यामुळे राऊत परिवारावर एकप्रकारे उपासमारीची वेळ आहे. पण, या परिवाराने कधीही परिस्थितीचे रडगाणे गायिले नाही किंवा कुणापुढे हात पसरले नाही. आहे त्या परिस्थितीत दिवस काढून मुलींच्या करिअरवर सध्या त्यांनी आपले सर्व लक्ष केंद्रीत केले आहे. पोरी हुशार असल्यामुळे भविष्यात एकदिवस नक्‍कीच त्या परिवाराचे नाव रोशन करतील, अशी आईवडिलांनाही आशा आहे.

आत्मरक्षणाच्या दृष्टीने मुलींना ज्यूदोमध्ये टाकले असले तरी चांगला "जॉब' मिळून त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात, हाही आमचा उद्देश होता. त्यामुळेच आर्थिक परिस्थिती बेताची असूनही आम्ही त्यांना काहीही कमी पडू दिले नाही. दररोजच्या कमाईतून शंभर-दीडशे रुपये वेगळे काढून त्यांच्या खेळावर आम्ही खर्च करतो. मुलींनीही आमच्या मेहनतीची कदर केली.

सुभाष राऊत, शुभांगीचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com