पन्नासावर सुवर्णपदके जिंकून देणारी आंतरराष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टरला करावा लागतोय हा व्यवसाय

नरेंद्र चोरे
Saturday, 28 November 2020

शहराला एवढी पदके व मानसन्मान मिळवून देऊनही अल्फियाला सरकारी नोकरी मिळू शकली नाही. गेल्या सात वर्षांच्या काळात तिने खेळाडू आणि ट्रेनर अशी दुहेरी जबाबदारी यशस्वी पार पाडत अनेक स्पर्धा गाजवल्या.

नागपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खोऱ्याने पदके व मानसन्मान मिळविल्यानंतर कोणत्याही खेळाडूला उदरनिर्वाहासाठी सरकारी नोकरीची अपेक्षा असते. त्याचा तो अधिकारही असतो. मात्र, एका महिला खेळाडूने पन्नासावर सुवर्णपदके जिंकूनही सरकारने कदर केली नाही. त्यामुळे नाइलाजाने तिला पोटापाण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा लागला.

ही कहाणी आहे नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टर व ‘वर्ल्ड चॅम्पियन’ अल्फिया शेख हिची. २३ वर्षीय अल्फियाने पॉवरलिफ्टिंगमध्ये तीन वर्ल्ड चॅम्पियनशिप गोल्डसह राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तब्बल ५३ सुवर्णपदके जिंकली. फिटनेस मॉडेलिंगमध्ये पाच किताब मिळविले.

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

उल्लेखनीय म्हणजे, फिटनेसमधील प्रतिष्ठेचे प्रो-कार्डही पटकावले. शहराला एवढी पदके व मानसन्मान मिळवून देऊनही अल्फियाला सरकारी नोकरी मिळू शकली नाही. गेल्या सात वर्षांच्या काळात तिने खेळाडू आणि ट्रेनर अशी दुहेरी जबाबदारी यशस्वी पार पाडत अनेक स्पर्धा गाजवल्या.

दुसऱ्याकडे ट्रेनर म्हणून काम करीत असतानाच अल्फियाने स्वतःचे जिम सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कारण, आजपर्यंत नागपुरातील कोणत्याच महिला खेळाडूने अशा प्रकारची हिंमत केलेली नाही. धरमपेठ परिसरात स्वबळावर सुरू केलेल्या या जिमसाठी तिने पुरस्कारांमध्ये जिंकलेली आतापर्यंतची आपली सर्व जमापुंजी खर्च केली. कोरोनाचा काळ असूनही सध्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तिने सांगितले.

क्लिक करा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी बाब

अल्फियाचा हा व्यवसाय नोकरीच्या मागे धावून आपले आयुष्य वाया घालविणाऱ्या अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी बाब आहे. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा देशासाठी पदक जिंकण्याची इच्छा असल्याचे ती म्हणाली. आतापर्यंतच्या करिअरमध्ये मदत करणारे प्रशिक्षक माजिद खान, कांतिश हाडके व अमर देवर यांनाही अल्फियाने य निमित्ताने धन्यवाद दिले.

सविस्तर वाचा - व्हॉट्‌सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या

सर्वच जण नशीबवान ठरत नाही
देशासाठी पदके जिंकल्यानंतर उदरनिर्वाहासाठी नोकरी मिळावी, ही प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. मात्र, सर्वच जण नशीबवान ठरत नाही. त्यामुळेच वाट पाहत बसण्यापेक्षा मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 
- अल्फिया शेख,
आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International women's powerlifter Alfia Sheikh opens gym