कोण म्हणतेय, आयपीएलमुळे होणार महिला क्रिकेटपटूंचा फायदा

नरेंद्र चोरे
Tuesday, 4 August 2020

आयपीएल मोठी स्पर्धा आहे. अशा स्पर्धेत खेळायला मिळणे, याला भाग्य लागते. युवा खेळाडूंसाठी हे फार मोठे व्यासपीठ असते. स्पर्धेचा महिलांना विशेषतः भारतीय क्रिकेटपटूंना चांगला फायदा होणार आहे.

नागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱ्या पुरुषांच्या आयपीएलसोबत यावेळी महिलांचेही सामने होणार आहेत. या सामन्यांमध्ये विदेशातील अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असल्याने, त्यांच्यापासून भारतीय क्रिकेटपटूंना खूप काही शिकायला मिळणार आहे. याचा फायदा भारतीय महिलांना घरगुती क्रिकेटमध्ये होणार असल्याचे मत, विदर्भातील आजी-माजी महिला क्रिकेटपटूंनी व्यक्त केले. 

लागोपाठ दोन विश्वचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोनाने बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत केले. ती म्हणाली, गेल्या तीन वर्षांपासून महिलांचे आयपीएल सामने होत आहेत. यावेळी कोरोनामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये होत आहे एवढाच एक फरक आहे. इतर देशांच्या तुलनेत टी-20 सामन्यांमध्ये भारतीय महिला खेळाडू कमजोर समजल्या जातात. मात्र आयपीएलमुळे त्यांच्यात अधिक पॉवर आणि आक्रमकता आली आहे. या स्पर्धेत विविध देशांतील नामवंत क्रिकेटपटूंचा सहभाग राहणार असल्याने, त्यांच्यासोबत खेळताना भारतीय महिलांना नक्कीच फायदा होणार आहे. विशेषतः घरगुती सामन्यांमध्ये खेळताना याचा फायदा होणार आहे. शिवाय आयपीएलमुळे महिला क्रिकेटची लोकप्रियताही वाढायला मदत होणार असल्याचे ती म्हणाली. मोनाचीही आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा आहे. संधी मिळाल्यास नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, असे ती यावेळी म्हणाली. 

 

हेही वाचा : मैदानावरच्या सरावाला ऑप्शनच नाही, घरात राहून होतंय "बोअर'!
 

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रियांकानेही बीसीसीआयच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, आयपीएल मोठी स्पर्धा आहे. अशा स्पर्धेत खेळायला मिळणे, याला भाग्य लागते. युवा खेळाडूंसाठी हे फार मोठे व्यासपीठ असते. स्पर्धेचा महिलांना विशेषतः भारतीय क्रिकेटपटूंना चांगला फायदा होणार आहे. महिला आयपीएलदरम्यान ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग होणार असल्याने आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खेळेल की नाही, याबद्दल मात्र तिने शंका व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू उपलब्ध न झाल्यास स्पर्धेची चमक थोडीफार फिकी पडू शकते, असे सांगून आयपीएल दरवर्षी नियमित व्हावी तसेच यात अधिकाधिक संघ सहभागी व्हावे, असेही ती यावेळी म्हणाली. आयपीएलमध्ये खेळायची माझीही इच्छा होती, पण क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे ते आता शक्य नाही. तथापि कोचिंग स्टाफमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. संधी मिळाल्यास नक्कीच विचार करेल. 

संपादन : नरेश शेळके 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL will benefit women cricketers