हायपर लोकल : चायनीज ठेल्यांवर रंगतात दारूच्या पार्ट्या; तरुणांची हुल्लडबाजी

मंगेश गोमासे
Thursday, 5 November 2020

ठेल्यावर दारू पिणे गुन्हा असताना खुलेआम दारू पिण्यास परवानगी देण्यात येत असल्याने येथे बरेच असामाजिक तत्वही येत असल्याचे दिसते. त्यामुळे सामान्यांना बराच त्रास होतो. तसेच या तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात येत असल्याने मुली आणि महिलांचे या परिसरातून फिरणे कठीण झाले आहे.

नागपूर : केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय चौक ते व्यंकटेशनगर चौकापर्यंत लागणाऱ्या चायनीजच्या ठेल्यावर खुलेआम दारूच्या पार्टी होत असल्याचे चित्र दिसून येते. याप्रकरणात परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून कुठलीच कारवाई होत नाही आहे.

गेल्या काही वर्षांत केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय चौक ते व्यंकटेशनगर चौकपर्यंत मोठ्या प्रमाणात चायनीज ठेले अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे या परिसरात वर्दळ वाढली आहे. मात्र, आता या वर्दळीमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. या ठिकाणी तरुणांची गर्दी असते. या ठेल्यांवर तरुणाई दारूच्या पार्ट्या करताना दिसून येतात. रात्री उशिरापर्यंत या पार्ट्या सुरू राहत असतात. त्या ठिकाणी रात्री शतपावलीसाठी निघणाऱ्या नागरिकांना त्रास होत असतो, हे विशेष...

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

ठेल्यावर दारू पिणे गुन्हा असताना खुलेआम दारू पिण्यास परवानगी देण्यात येत असल्याने येथे बरेच असामाजिक तत्वही येत असल्याचे दिसते. त्यामुळे सामान्यांना बराच त्रास होतो. तसेच या तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात येत असल्याने मुली आणि महिलांचे या परिसरातून फिरणे कठीण झाले आहे. याबाबत अनेकदा पोलिसांना तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र, पोलिसांची पॅट्रोलिंग व्हॅन केवळ नावापुरती असून पोलिस त्यांच्याकडून हप्ता वसुली करून निघून जातात. त्यामुळे ठेलेवाल्यांसोबत असामाजिक तत्वही निर्ढावलेले आहेत.

वाहतुकीला त्रास

केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय चौक ते व्यंकटेशनगर चौक यादरम्यान मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात लागलेल्या चायनीज ठेल्यांमुळे वाहतुकीला त्रास होतो. याशिवाय ठेल्यावर आलेले तरुण रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्किंग करीत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनाही याचा फटका बसतो. त्यामुळे पोलिसांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iquor parties painted on Chinese carts