रेल्वेच्या दोन हजार किलो लोखंडचोरीचा पर्दाफाश 

योगेश बरवड
Thursday, 24 September 2020

शनिवारी दुपारी दीडच्या सुमारात शिवा व मुख्तार हे रेल्वे स्टेशनच्या आवारीतील अभियांत्रिकी आणि सिग्नलिंग व टेलिकम्युनिकेशन विभागाच्या उपयोगाचे लोखंडी साहित्य ई-रिक्षात भरून घेऊन जाताना दिसले. जवानांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेल्वेच्या मालकीच्या २ हजार किलो लोखंडचोरी प्रकरणाचा छडा लावला. भंगार व्यावसायी व ऑटोचालकासह चौघांना जेरबंद करण्यात आले आहे. 

शिवा समसेरिया (३६) रा. पंजाबी लाइन, रिपब्लिकननगर, इंदोरा, मुख्तार खुर्शीद अन्सारी (६५) रा. सैलानीनगर, अशी चोरट्यांची नावे आहेत. प्रशांत ढाकने (५०) रा. घाटरोड असे भंगार व्यावसायिकाचे तर शेख मोहम्मद असे ऑटोचालकाचे नाव आहे. 

सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे कर्मचारी भूपेंद्र बाथरी, नवीन कुमार, नवलसिंह डाबेराव, अनिल उसेंडी, राजेश गडपलवार हे रेल्वेस्थानकावरील हालचालीवर लक्ष ठेवून होते. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारात शिवा व मुख्तार हे रेल्वे स्टेशनच्या आवारीतील अभियांत्रिकी आणि सिग्नलिंग व टेलिकम्युनिकेशन विभागाच्या उपयोगाचे लोखंडी साहित्य ई-रिक्षात भरून घेऊन जाताना दिसले. जवानांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करीत पोलिस कोठडी प्राप्त करण्यात आली.

फसवणुक! जेमतेम सातवी पास आणि करतात डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार

त्यांनी चोरीचा माल घाटरोड येथील प्रशांतच्या दुकानात विकल्याची कबुली दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्रशांतच्या प्रतिष्ठानावर धाड टाकली. त्याच्या दुकानात रेल्वेच्या मालकीचे सुमारे २ हजार किलो वजनाचे लोखंडी साहित्य आढळून आले. ऑटोचालक शेख महमूदलाही जेरबंद करण्यात आहे. चारही आरोपींना रेल्वे अधिनियमान्वये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे. 

रेल्वेची वीजवाहिनी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना अटक 
रेल्वे इंजिनाला वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी (ओएचई) चोरट्यांनी चोरून नेली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलातील जवानांनी प्रकरणाचा छडा लावत तीन चोरट्यांना गजाआड केले. तांब्याची तार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकालासुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. 

नारायणदास जयचंददास बैरागी, अंशुल महादेव गोहिते व सुधीर नान्हू गिरहारे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सध्या कळमना-कोराडी सेक्शनमध्ये विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी तांब्याच्या केबल आणल्या आहेत. चोरट्यांनी ६० मीटर लांबीची केबल चोरून नेली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांच्या आदेशानुसार निरीक्षक आर. के. सिंग यांच्या नेतृत्वात चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला.

आरपीएफ उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून केबल जप्त करण्यात आली. केबल खरेदी करणारा नरेश शाहू यालाही अटक करण्यात आली. एकूण २२ हजार रुपयांची ७० मीटर केबल जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत विवेक कनोजिया, ईशांत दीक्षित, प्रदीप गाढवे यांचाही समावेश होता. उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन तपास करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iron theft exposed