सिंचन घोटाळा प्रकरण : एसीबीच्या महासंचालकांची माफी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

सिंचन घोटाळ्यांमध्ये 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा 2011 मध्ये करण्यात आला. या प्रकरणी नागपूर खंडपीठात वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल करण्यात आल्या.

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) तत्कालीन पोलिस महासंचालक संजय बर्वे यांच्यावर आरोप करणे एसीबीचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्या अंगलट आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्रातून याबाबत केलेले वक्तव्य खोडून काढण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये, त्यांनी झालेला प्रकार ही माझी चूक असून त्याकरिता न्यायालयाची माफी मागितली आहे. 

सिंचन घोटाळ्यांमध्ये 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा 2011 मध्ये करण्यात आला. या प्रकरणी नागपूर खंडपीठात वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर 2014 साली राज्य सरकारने सिंचन घोटाळ्याची एसीबीकडून खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून न्यायालयाने अजित पवारासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. सिंचन घोटाळ्यासाठी अजित पवार जबाबदार आहेत, असे प्रतिज्ञापत्र 26 नोव्हेंबर 2018 रोजी एसीबीचे तत्कालीन पोलिस महासंचालक संजय बर्वे यांनी दाखल केले होते. 

हेही वाचा - Video : चंद्रपूर जिल्ह्याच्या पोटात पेट्रोलचा साठा, काय आहे सत्य?
 

अमरावती व नागपूर एसआयटीच्या अधीक्षकांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून सिंचन घोटाळ्यासाठी अजित पवार जबाबदार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र दाखल केले. एकाच विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकांमध्ये तफावत असल्याने प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा ईडीकडे सोपविण्याची विनंती जनमंच व सामाजिक कार्यकर्ते अतुल जगताप यांनी केली. त्यावर एसीबीचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यानुसार, 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत सिंचन घोटाळ्याचा तपास पूर्ण झालेला नव्हता. कोणत्याही तपास अधिकाऱ्याने अजित पवार यांच्यासंदर्भात आपला अहवाल पोलिस महासंचालकांना सोपवला नव्हता. 

यावरून तेव्हा प्रतिज्ञापत्र तयार करताना निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही दस्तावेजांचा आधार नव्हता. 26 मार्च 2018 ला विदर्भ सिंचन विकास महामंडळांतर्गत (व्हीआयडीसी) सादर केलेल्या पत्रावर अमरावती व नागपूर एसीबीच्या अधीक्षकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. पण, त्याचाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात नसून तत्कालीन संचालक संजय बर्वे दुर्दैवाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा दावा परमबीर सिंग यांनी 19 डिसेंबरला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केले. पण, परमबीर सिंग यांनी 21 डिसेंबरला पुन्हा एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून संजय बर्वे यांच्या वेळीही व्हीआयडीसीचे दस्तावेज उपलब्ध होते, असे मान्य केले आहे. ही चूक माझ्या स्तरावर झालेली असून त्याकरिता न्यायालयाची माफी मागितली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irrigation scam case: ACB general director apologizes