जे याआधी कधीच झाले नाही ते नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी केले

मंगेश गाेमासे
Monday, 10 August 2020


कुलगुरु पद हे अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे पद मानले जाते. या पदावरील व्यक्ती सहसा राजकीय नेत्यांशी थेट संपर्क ठेवत नसतो आणि नैतिकदृष्टया ते योग्य नाही. पण प्रत्येक गोष्टीला काही ना काही अपवाद असतातच..

नागपूर :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या आमदारांची भेट घेतली. नियुक्ती होताच कुलगुरूंनी नेत्यांच्या भेटी घेतल्याने विद्यापीठ वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

शिक्षण मंचाचे डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती होण्याआधी तेच कुलगुरू होणार, अशी खात्री संघटनेकडून देण्यात येत होती. अनेकांनी उघडपणे तसे बोलूनही दाखवले. त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. विशेष म्हणजे, त्यांच्यासाठी शेवटपर्यंत शिक्षण मंचाकडून राज्यपालांकडे ‘फिल्डिंग' लावण्यात आली होती, अशीही चर्चा आहे.

वाचा- सुट्टीचा दिवस म्हणून तो होता घरीच..अचानक ४ जण घरात घुसले आणि घडली जीवाचा थरकाप उडवणारी घटना..वाचा नक्की काय घडले

काल पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. चौधरी यांनी आज शिक्षण मंचाच्या अध्यक्षा कल्पना पांडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे, विद्वत परिषद सदस्य डॉ. संजय दुधे यांच्यासह केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यानंतर पदवीधर मतदारसंघाचे आमदार प्रा. अनिल सोले आणि चंद्रपूर-वर्धा-गडचिरोलीचे आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचीही त्यांनी भेट घेतली. निवड झाल्यानंतर याआधी एकाही कुलगुरूने अशाप्रकारे राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या नव्हत्या.

संपादन-  अनिल यादव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is never happened before...