बी-बियाणे, खते उधारीवर मागण्याची आली वेळ, झाले तरी काय,...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

शेतकरी आता हंगामाच्या तोंडावर बराच हवालदिल झाला आहे. त्याला आता केवळ पैशाची आस आहे. एकीकडे मागील हंगामातील सर्व माल घरात भरून पडलेला असताना हंगामावर बि-बियाणे घ्यायला दमडी नाही. अशावेळी दुकानदारांकडे बि-बियाणे, खते उधारीवर मागण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नाही.

कामठी (जि.नागपूर) : मॉन्सून पेरणीची लगबग लागलेली असताना अनेक शेतकऱ्यांजवळ पेरणीची सोय नाही. कारण शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्याप या शेतकऱ्यांचा कापूस, हरभरा, चणा विक्रीअभावी घरातच पडून आहे. त्यामुळे बी-बियाणे, खतं कुणी उधार देता का उधार, असे म्हणण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. तर दुसरीकडे मृग नक्षत्र लागण्यापूर्वी पावसाचे आगमन झाल्याने कृषी विभागाने तालुक्‍यात 25 हजार 669 हेक्‍टर जमिनीत धान, कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, भाजीपाला, फुले, मिरची, शिंगाडे आदी पिकांचे लागवड करण्याचे नियोजन केले आहे.

हेही वाचा : चार वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याच्या तयारीत होता युवक..मग अचानक

शेतकऱ्यांच्या मागची संकटे
शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे, अशा शेतकरयांना कापसाचे चुकारे मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ संकटे कोसळत आहेत. नापिकी, बोंडअळीचे आक्रमण, गारपीट तसेच टोळधाडीमुळे शेतपिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. शेतपिकांना बाजारभावही मिळाला नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्यांनी बॅंकेसह सावकारांकडून खासगी कर्ज घेतले. कर्जाची परतफेड शेतीपिकांवर झाली नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. सरकारची कर्जमाफी अजून काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. घरात कापूस असून विक्रीसाठी नंबर लागत नाही. यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या घरात कापूस व हरभरा, चणा साठवून आहे. अडीच महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने उसनवारी पैसा देणार तरी कोण, हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल निघाल्यावर उसनवारी घेतलेल्या पैशांच्या परतीची बोली करावी लागते. शेतातील पिके निघेपर्यंत थांबेल तरी कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी दरवर्षी पीक घेण्याकरिता विविध बॅंकेकडून कर्ज घेऊन शेती करतो, मात्र निसर्गाने कधी डोळे फिरविले तर या शेतकऱ्यांना कर्ज फेडणे तर दूर परिवाराचा उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसते. शेतकरीवर्ग इतर काही पर्याय नसल्याने बॅंकेचे, सावकाराचे कर्ज घेऊन शेती करतो. या कर्जाची परतफेड करण्यास शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते.

हेही वाचा : लाडक्‍या मुलाची तक्रार घेतल नाही, मग वडील वकीलाने केली ठाणेदारांविरूद्‌ध तक्रार

बियाण्यांचा साठा कमी पडणार नाही
कोणत्याही शेतकऱ्यांना खते व बियाणे कमी पडणार नाही असा आवश्‍यक असलेला साठा कामठी तालुक्‍याला उपलब्ध करून दिला जाईल, म्हणून शेतकऱ्यांनी बोगस बी-बियाणे लावण्याचे कारण नाही.
मनीषा राऊत, तालुका कृषी अधिकारी कामठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is time to borrow seeds, fertilizers, whatever happens, ...