विचार जुळले, मन जुळले आणि ते झाले जीवनसाथी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

दोघेही भिन्न जातीचे, धर्माचे असले तरी त्यांचे विचार जुळून आले आणि साहजिकच मनही जुळले. त्यामुळे प्रियकर नसतानाही त्या दोघांनी जीवनसाथी होण्याचा निर्णय घेतला.

नागपूर : प्रेमासाठी मन जुळावे लागते. विचार जुळावे लागतात. एकमेकांबद्दल आदर असावा लागतो. असे असेल तर अशा प्रेमाचे रूपांतर जीवनसाथी होण्यास कुणाचीही आठकाडी नसते. नागपूरचा प्रतीक आणि इंदोरचा सिल्विया या जोडीची ही कहाणी.

दोघेही भिन्न जातीचे, धर्माचे असले तरी त्यांचे विचार जुळून आले आणि साहजिकच मनही जुळले. त्यामुळे प्रियकर नसतानाही त्या दोघांनी जीवनसाथी होण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या विवाह सोहळ्याची शहरात चांगलीच चर्चा होती. ती इंदूर येथील मोठ्या कंपनीत एच. आर. मॅनेजर तर तो नागपूरला एका खासगी कंपनीत कार्यरत. दोघंही उच्चशिक्षित आणि आधुनिक विचार सरणीचे. घरी लग्नाचा विषय निघाल्यावर त्यांनी एका संकेतस्थळावर नाव नोंदणी केली. प्रोफाईलमध्ये जात, धर्म, पंत, रंग, देश या कुठल्याही अटीशिवाय जीवनसाथी निवडण्याची तयारी दाखवली. म्हणून, संबंधित संकेतस्थळाने दोघांनाही एकमेकांचा पर्याय दाखवला. दोघांची ओळख झाली. दोघांचेही धर्म वेगळे असले तरी विचार आणि कौटुंबिक परिस्थिती मिळती जुळती असल्याने, घरच्यांनी या नात्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहत विवाह निश्‍चित केला.

वाचा - अन विदर्भाच्या विजयावर फिरले पाणी

डिसेंबर 2019 मध्ये इंदूर येथे साखरपुडाही पार पडला. एक जूनला लग्नाची तारीख निश्‍चित करण्यात आली. परंतु, कोरोनामुळे जगभरात लॉकडाउन झाले. त्यातूनही मार्ग काढत, दोन्ही कुटुंबाने ठरलेल्या तारखेला चर्चमध्ये मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याचे निश्‍चित केले. प्रतीक सरदार आणि सिल्विया मार्शल या दोघांचाही सदर येथील सेंट फ्रान्सीस डीसेल चर्चमध्ये मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. लॉकडाउनच्या काळात अनेक विवाह पार पाडले असले तरी, आजचा विवाह अनोख्या पद्धतीने पार पडल्याने, परिसरात चर्चेचा विषय होता. जात, धर्माला फाटा तर दिलाच शिवाय लॉकडाउननंतर रीतसर परवानगी घेऊन, नागपूर शहरात झालेला पहिला विवाह असावा.

आणखी वाचा - नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, सलून, स्पाबाबत आला हा निर्णय...

पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझरची भेट
विवाह आदर्श पद्धतीने पार पाडीत, कोविड योद्धा असलेल्या पोलिसांना कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्क, सॅनिटायझर, ग्लोज असे सुरक्षा साहित्याचे यावेळी वाटप करण्यात आले. याशिवाय लग्नानिमित्त पोलिस कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या आवश्‍यक साहित्य खरेदी करण्यासाठी अकरा हजारांचा चेकही सरदार कुटुंबाकडून नागपूर पोलिसांना भेट स्वरूपात देण्यात आला.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It's not love story but still they tie knot