कोरोनाऐवजी उपासमारीने मरण्याची वेळ, जाणून घ्या नागरिकांची व्यथा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

वागदरा येथील वॉर्ड क्रमांक चारमधील कंटेन्मेंट झोनमधील व्यक्ती शेतमजूर, हातमजुरी आणि खासगी क्षेत्रात काम करणारे आहेत. लॉकडाऊन झाल्यानंतर परिसरातील सगळीच कामे ठप्प झाली.

गुमगाव (जि. नागपूर) : नजीकच्या बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसी परिसरात वाढत्या कोरोनामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. हिंगणा तालुक्‍यातील वागदरा (नवीन गुमगाव) येथे 30 मे रोजी कोरोनाने एन्ट्री केली. येथील वॉर्ड क्रमांक चारमधील पती आणि पत्नीचा कोव्हिड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना नागपूर येथील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. आता येथील 44 वर्षीय मजुराने आणि त्याच्या पत्नीने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली असून, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची नागपूर येथील विलगीकरण कक्षातून घरवापसी झाली. क्षेत्र प्रतिबंधित केल्याने आमचे रोजगार "लॉक' झाले असून, आर्थिक परिस्थिती "डाऊन' झाली आहे. कोरोना व्हायरसऐवजी उपासमारीनेच मरण्याची वेळ सध्या आमच्यावर असल्याचे नागरिकांनी सांगितले.

गावात आता कोणताही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने आतातरी वॉर्ड क्रमांक चार येथील सील करण्यात आलेला परिसर पूर्ववत सुरू करावा, अशा मागणीचे निवेदन कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत जिल्हाधिकारी, हिंगणा तहसीलदार आणि आमदार समीर मेघे यांना पाठविले आहे. वागदरा येथील वॉर्ड क्रमांक चारमधील कंटेन्मेंट झोनमधील व्यक्ती शेतमजूर, हातमजुरी आणि खासगी क्षेत्रात काम करणारे आहेत. लॉकडाऊन झाल्यानंतर परिसरातील सगळीच कामे ठप्प झाली. अनेकांचा रोजगार बुडाला. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस अचानक गावात कोरोनाने एन्ट्री केली. त्यामुळे हा परिसर गेल्या काही दिवसांपासून सील आहे. आता दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला असून गावातील व्यक्तींची विलगीकरण कक्षातून सुखरूप सुटका करण्यात आल्याने सील करण्यात आलेला परिसर पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी केली.

शाळांनी सुरू केला नवा फंडा; पैसे द्या अन्यथा 'तुम्ही तुमचे पाहून घ्या'

रोजगार झाला 'लॉक'
धान्य संपले, होते-नव्हते ते सगळे पैसे खर्च झाले, मीठ आहे तर तिखट नाही आणि तिखट आहे तर तेल नाही अशी आमची गत आहे. आमचे रोजगारसुद्धा जाण्याच्याच मार्गावर असून, आता तर कंपनीतून काढून टाकण्यात येणार असल्याचे कॉल यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाने मरण्याऐवजी आधी उपासमारीने मरण्याची वेळ आमच्यावर आल्याने आमच्या परिसरातील प्रतिबंध लवकरात लवकर हटविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन येथील नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत हिंगणा तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि आमदार समीर मेघे यांना पाठविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It's time to starve to death instead of corona