ते' पोहोचविणार जगभरात महात्मा गांधींचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

महात्मा गांधी यांच्या विचाराने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. त्यामुळे त्यांचा विचार आणि संदेश घेऊन स्पेन, फ्रान्स, कॅनडा, न्युझीलंड, स्वित्झर्लंड, अर्जेंटिना या देशांतील पंधराहून अधिक महिला, पुरुष आणि युवकांसह देशातील विविध पन्नास लोकांच्या सहभागातून दिल्ली ते जिनेव्हा (स्वित्झर्लंड) यादरम्यान 2 ऑक्‍टोबरपासून राजघाट येथून यात्रेस सुरुवात करण्यात आली.

नागपूर : आज देशासह संपूर्ण जगात अशांततेचे वातावरण पसरले आहे. पर्यावरणासह, गरिबी, असमानता या सारख्या समस्यांची भीषणता वाढली आहे. या समस्यांवर समाधान म्हणजे महात्मा गांधी यांचे विचार असून, यातून वैश्‍विक समस्या सोडविता येणे शक्‍य असल्याने जगभरातील पन्नास नागरिकांनी महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जन्मशताब्दी निमित्ताने 2 ऑक्‍टोबर 2019 ते 2 ऑक्‍टोबर 2020 यादरम्यान "जय जगत 2020' या वैश्‍विक पदयात्रेस सुरुवात केली आहे. रविवारी (ता. 19) ही यात्रा नागपुरात दाखल झाली होती.

सविस्तर वाचा - आईने बाळाला वॉकरमध्ये ठेवले अन झाला घात

 

जगात वाढत चाललेली अशांतता आणि द्वेष, जात, धर्म आणि पंथ यामुळे मनुष्य एकमेकांपासून दुरावत चालला आहे. या वातावरणामुळे समाजामध्ये विविध समस्या निर्माण होत असून विनाशाकडे मनुष्य जातो आहे. जगातील प्रत्येक समस्येवर महात्मा गांधी यांच्या विचारांतून उत्तर मिळत असल्याने त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसाराची आजही समाजाला गरज आहे. महात्मा गांधी यांच्या विचाराने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. त्यामुळे त्यांचा विचार आणि संदेश घेऊन स्पेन, फ्रान्स, कॅनडा, न्युझीलंड, स्वित्झर्लंड, अर्जेंटिना या देशांतील पंधराहून अधिक महिला, पुरुष आणि युवकांसह देशातील विविध पन्नास लोकांच्या सहभागातून दिल्ली ते जिनेव्हा (स्वित्झर्लंड) यादरम्यान 2 ऑक्‍टोबरपासून राजघाट येथून यात्रेस सुरुवात करण्यात आली. यात्रेचे नेतृत्व पी. व्ही. राजगोपाल करीत आहेत. यात्रा आतापर्यंत 90 दिवसांत जवळपास पाच राज्यांतून प्रवास करून रविवारी नागपुरात दाखल झाली होती. 30 जानेवारीला यात्रा सेवाग्राम येथे पोहोचणार आहे. यानंतर जवळपास इराण, अर्मेनिया, जॉर्जिया, बल्गेरिया, क्रोएशिया, सर्विया, इटली, स्वित्झर्लंड, नेपाळ, पाकिस्तान या देशांतून ही यात्रा प्रवास करणार आहे. पाकिस्तानात जाण्यासाठी नेपाळचा वेगळा चमू तयार करण्यात आलेला असल्याचे योगेश मथुरिया यांनी सांगितले.

दरम्यान, नागपुरात यात्रेमधील विदेशी स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी बजाजनगर येथील कस्तुरबा भवन येथील सभागृहात संवाद साधला. यावेळी मुदीत, सतीश काचारी, श्रुतिका, सनी कुमार बोजा या युवकांनी गरिबी निर्मूलन, हिंसामुक्ती, समानता व न्याय, जलवायू प्रदूषणावर आपले मत व्यक्त केले. यावेळी माजी प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, एनएसएस संचालक डॉ. केशव वाळके, ज्येष्ठ गांधी विचारक मामा गडकरी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jay Jagat 2020 for Gandhi"s thought