मध्यवर्ती कारागृहानंतर आता न्यायसहाय्यक प्रयोगशाळा! जबाबदार कोण?

corona
corona

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा उद्रेक झाला. येथे सारे खाकी वर्दीतील कर्मचारी मुक्तपणे वावरत होते. एका खाकी वर्दीवाल्याच्या चुकीमुळे मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला. नव्हे कारागृहात कोरोनाचा ब्लास्ट झाला. पोलिसांसह येथील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील लोकांनाही याची शिक्षा भोगावी लागली. हीच परिस्थिती कारागृहापासून अवघ्या काही अंतरावरील राहाटे कॉलनीतील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेची आहे.

येथे लॉकडाउनचे नियम पाळले जात नाही. लॉकडाउन शिथिल झाले, परंतु पंधरा टक्के कर्मचारी उपस्थित राहावे असा अद्यादेश असताना या प्रयोगशाळेत 100 टक्के अधिकारी-कर्मचारी कर्तव्यावर आहेत. गृहमंत्र्यांच्या शहरातच शासनाच्या अध्यादेशाला हरताळ फासला जात आहे. यामुळे या प्रयोगशाळेतही कोरोनाचा शिरकाव होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूरच्या न्यायसहायक प्रयोगशाळेत एकूण मंजुर कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे दीडशेच्या घरात आहे. यात सहायक रासायनिक विश्‍लेषक, वैज्ञानिक सहायक, प्रयोगशाळा परिसर, लिपिक, टंकलेखक, स्वच्छता कर्मचारी यांच्यापासून तर शिपायांची पदे आहेत. या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर डीएनए, बॅलेस्टिक, दारु विभाग, सायबर, जीवशास्त्र विभाग, विष विभागात नमुने तपासणीचे काम चालते. विशेष असे की, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात विदर्भातून पोलिस मुद्देमाल घेऊन येतात.

गुरूवारी (ता.2) एका खाकी वर्दीवाल्या पोलिस काकांसोबत या प्रयोगशाळेत भेट देण्याचा प्रसंग आला असता, येथील वातावरण कोरोनाच्या रडारवर असल्याचे दिसून आले. या प्रयोगशाळेत 100 टक्के कर्मचारी अधिकारी उपस्थित असल्याने ना सामाजिक अंतर पाळले जात. ना योग्य अंतर ठेवता येते. याशिवाय दिवसभर विदर्भातील विविध भागातून मुद्देमाल आणणाऱ्या पोलिसांसोबत संवाद साधण्यासंदर्भात कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे चित्र दिसून आले. प्रयोगशाळेच्या आवारात कर्मचाऱ्यांचा घोळका दिसला. हा घोळका कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी पुरेसा आहे. प्रवेशद्वारावरच स्टुलवर बसलेल्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या भोवताल खाकी वर्दीतील तीन पोलिस दिसले. सहज विचारले असता, तीन दिवसांपासून सर्वच कर्मचारीकार्यालयात येत असल्याची माहिती मिळाली.

30 जून पर्यंत 50 टक्के कर्मचारी एक दिवसाआड येत होते. विशेष असे की, मस्टरवर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी होत असे. कार्यालयात बसतानाही विशिष्ट अंतर ठेवण्यात येत नाही. यामुळे कोरोनाचा शिरकाव झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल पुढे आला आहे.

मास्क दिसतात नाकाखाली
कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क दिसतात. परंतु ते मास्क लावण्याची पद्धत वेगळीच दिसली. तोंड आणि नाक पूर्ण झाकले जाईल असा मास्क लावण्यात यावा. परंतु नाकाच्या खाली मास्क घालून संवाद साधण्यात येत असल्याचे दिसून आहे. सॅनिटायझरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यात मात्र कोणतीही कसर सोडत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com