नागपूरसाठी दुग्धशर्करा योग सरन्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दोघेही नागपूरकर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

 सरन्यायाधीशपदी नागपूरकर शरद बोबडे असतांनाच न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्याकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाचा प्रभार येणे, हा नागपूरकरांसाठी दुग्धशर्करा योग आहे.

नागपूर : मूळचे नागपूरकर असलेले न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आज निवृत्त झाले. त्यांच्या जागी केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने अधिसूचना जारी करीत न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या हाती मुख्य न्यायमूर्ती पदाची सूत्रे सोपविली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी दोन महिन्यांनी निवृत्त होत असून त्या आधी त्यांना मुख्य न्यायमूर्ती पदाचा प्रभार देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - परीक्षेला जाताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स
 सरन्यायाधीशपदी नागपूरकर शरद बोबडे असतांनाच न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्याकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाचा प्रभार येणे, हा नागपूरकरांसाठी दुग्धशर्करा योग आहे.

पुढील दोन महिने ते मुख्य न्यायमूर्ती म्हणून पद भूषवणार
न्यायमूर्ती भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांचा जन्म 28 एप्रिल 1958 रोजी नागपूर शहरामध्ये झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून 1977 साली बी.एससी (जीवशास्त्र), बी. ए. (इंग्रजी साहित्य) आणि 1980 साली एलएलबीची पदवी प्राप्त केली. 17 ऑक्‍टोबर 1980 रोजी त्यांनी सनद प्राप्त केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी जबलपूर येथे ऍड. वाय. एस. धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात वकिली केली.त्यानंतर, 1984 साली नागपूर शहरामध्ये परत येत ऍड. एच. एस घारे यांच्यासह वकिली केली. घारे यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी आपला स्वतंत्र वकिली व्यवसाय थाटला. या दरम्यान, अनेक सरकारी संस्था, उद्योग, संघटना आणि खासगी पक्षकारांसाठी त्यांनी कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, दिवाणी व फौजदारी न्यायालये, उच्च न्यायालय, प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये बाजू मांडली. हायकोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी होत त्यांनी 3 वर्षे ग्रंथपाल म्हणून आणि सलग 3 वर्षे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडली. 1997 सालापासून त्यांनी न्यायिक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांची प्रथम 15 मार्च 2004 रोजी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आणि 12 मार्च 2006 रोजी न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली आहे. 28 एप्रिल 2020 रोजी न्यायमूर्ती धर्माधिकारी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून निवृत्त होतील. त्यामुळे, पुढील दोन महिने ते मुख्य न्यायमूर्ती म्हणून पद भूषवणार आहेत.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Justice Bhushan Dharmadhikari is Chief Justice of Mumbai High Court