esakal | Video : चंद्रमौळी घरातील कबड्डीपटू शुभमचा खेळण्यासाठी नव्हे जगण्यासाठी संघर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

शुभम बावणे

विदर्भात सध्याच्या घडीला सर्वोत्तम कबड्डीपटू मानल्या जाणाऱ्या शुभमचे चौथी पास वडील (ज्ञानेश्वर) दिवसभर सायकलरिक्षा ओढतात, तर निरक्षर आई (पौर्णिमा) घरोघरी धुणी-भांड्याची कामं करते. जुनी शुक्रवारीत टिनाचं झोपडीवजा घर. अशा परिस्थितीत मुलानं कबड्डीपटू होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मैदानावर पाऊल ठेवलं.

Video : चंद्रमौळी घरातील कबड्डीपटू शुभमचा खेळण्यासाठी नव्हे जगण्यासाठी संघर्ष

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : कोरोना महामारीमुळे कुणाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, तर अनेकांपुढे जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. दोन वेळच्या जेवणासाठी अनेकांना हात पसरावे लागत आहे. अशा परिस्थितीत आवडता खेळ खेळण्याचा विचारही कुणी करू शकत नाही. अनेक क्रीडापटू पुढे खेळ सुरू ठेवायचा की नाही, याविषयी विचार करतील. विदर्भाचा कबड्डीपटू शुभम बावणे हा त्यापैकीच एक.


विदर्भात सध्याच्या घडीला सर्वोत्तम कबड्डीपटू मानल्या जाणाऱ्या शुभमचे चौथी पास वडील (ज्ञानेश्वर) दिवसभर सायकलरिक्षा ओढतात, तर निरक्षर आई (पौर्णिमा) घरोघरी धुणी-भांड्याची कामं करते. जुनी शुक्रवारीत टिनाचं झोपडीवजा घर. अशा परिस्थितीत मुलानं कबड्डीपटू होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मैदानावर पाऊल ठेवलं. पण, आयुष्यात पावलोपावली संकटांनी त्याची जणू परीक्षाच घेतली. कधी आर्थिक अडचणी, तर कधी संघटनेतील अंतर्गत भांडणाचा फटका. मात्र, प्रत्येक अडथळ्यांवर मात करीत तो झपाट्याने स्वप्नपूर्तीकडे झेपावत आहे. शुभम केवळ एकोणीस वर्षांचा आहे. पण, त्याच्यात कमालीची गुणवत्ता असल्याचे अनुभवी खेळाडू मानतात. ज्युनिअर गटातील उत्कृष्ट रेडर म्हणून त्याची विदर्भात ओळख आहे. चुलत भावाला खेळताना पाहून अवघ्या दहाव्या वर्षी कबड्डी खेळायला सुरुवात करणाऱ्या शुभमने अल्पावधीतच आपली छाप सोडली.

वाचा - क्वारंटाईन महिला सुरक्षित आहेत? प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना!

ज्युनिअर गटात जिल्हा, विभागीय व राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तो राष्ट्रीयस्तरावर पोहोचला. यावर्षीही त्याची राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली होती. लवकरच सिनियर गटात प्रवेश करणार असल्याने शुभमकडून येथेही चांगल्या कामगिरीची त्याचे गुरू व सहकारी खेळाडूंना अपेक्षा आहे. आईवडिलांच्या कमाईत घर चालत नसल्याने स्वतः शुभमही खेळ व शिक्षणासोबतच ब्लड बॅंक किंवा लॅबमध्ये औषधी सप्लायचे पार्टटाईम काम करून कुटुंबाला आधार देत आहे. मात्र, लॉकडाउनमुळे गेल्या दोन अडीच महिन्यांपासून तिघांचीही कामे बंद असल्याचे शुभमने सांगितले. केवळ शुभमलाच कधीकधी कामासाठी बोलावले जाते. त्यामुळे दोनवेळच्या जेवणासाठी परिवाराला संघर्ष करावा लागत आहे. लॉकडाउन काळात दोघा-तिघांनी रेशनची किट आणून दिली. शिवाय प्रशिक्षक शशांक वानखेडे व शुभमच्या एकलव्य क्‍लबमधील काही मित्रांनी थोडीफार मदत केली.

आणखी वाचा - Video : खरचं राजकीय भूकंप होणार? सुधीर मुनगंटीवार म्हणतात...

बावणे परिवार सध्या आर्थिक अडचणीत असला तरी शुभम हिंमत हारला नाही. खेळावरील लक्षही कमी होऊ दिले नाही. लॉकडाउन उघडल्यानंतर पुन्हा जोमाने नव्या मोसमाची तयारी करणार असल्याचे त्याने सांगितले. खेळ, शिक्षण व पार्टटाईम ड्यूटी अशी तिहेरी कसरत करीत असलेल्या शुभमला राष्ट्रीयस्तरावर नागपूर व विदर्भाला नावलौकिक मिळवून द्यायचा आहे. तसेच संधी मिळाल्यास प्रो-कबड्डीत खेळायचे आहे. उल्लेखनीय म्हणजे, खेळाच्या भरवशावर एखादी नोकरी मिळवून आईवडिलांचे ऋण फेडायचे आहे.

शुभमला मी लहानपणापासून पाहात आलोय. त्याच्यात प्रचंड "टॅलेंट' आहे. त्याचा या वयातील जबरदस्त खेळ बघता वरच्या "लेव्हल'वर खेळण्याची निश्‍चितच क्षमता आहे. अशीच मेहनत आणि सात्यत्यपूर्ण कामगिरी राहिल्यास राष्ट्रीय पातळीवर तो भविष्यात धमाल करू शकतो.
शशांक वानखेडे, शुभमचे प्रशिक्षक

go to top