हे कसे काय? कालिदास महोत्सव, प्रशासनाचा दुजाभाव ?

वसंत डामरे
गुरुवार, 30 जानेवारी 2020

लोकप्रतिनिधी आणि राज्य शासनाने हा तिढा कायमचा सोडवून दरवर्षी कालिदास महोत्सव रामटेकला झालाच पाहिजे, असा शासननिर्णय घ्यावा, अशी मागणी रामटेकच्या रसिकांनी केली .

रामटेक (जि.नागपूर) : महाकवी कालिदास आणि रामटेकचे नाते माहीत असूनही दरवेळी कालिदास महोत्सवाच्या वेळी रामटेकला डावलण्याचा कालिदास महोत्सव आयोजन समिती व महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ सतत प्रयत्नात असते. राज्य शासनाने तीन दिवस नागपूर व दोन दिवस रामटेक येथे असा आदेश देऊनही प्रत्येक वेळी असा प्रयत्न का केला जातो, हे अनाकलनीय आहे. लोकप्रतिनिधी आणि राज्य शासनाने हा तिढा कायमचा सोडवून दरवर्षी कालिदास महोत्सव रामटेकला झालाच पाहिजे, असा शासननिर्णय घ्यावा, अशी मागणी रामटेकच्या रसिकांनी केली आहे.

क्‍लिक करा : तुम्हीच सांगा जी....निदानच झाले नाही तर उपचार कसे होणार?

रामटेककरांच्या तोंडाला पाने पुसण्यात प्रशासन यशस्वी

नोव्हेंबर 2019 मध्ये कालिदास महोत्सव आयोजन समिती, म. रा. पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्याने नागपूर येथे कालिदास महोत्सव थाटात पार पडला. त्यानंतर रामटेक येथे लवकरच कालिदास महोत्सवाच्या आयोजनाची घोषणा केली जाईल, या आतुरतेने रामटेकची जनता वर्तमानपत्र दररोज चाळते. मात्र, जानेवारी उलटूनही याबाबतची कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे यावर्षी कालिदास महोत्सव रामटेक येथे आयोजित केला जाणार नाही, हे स्पष्ट होऊ लागले आहे. वास्तविक पाहता महाकवी कालिदासांचा रामटेकशी असलेल्या संबंधांची माहिती असूनही जिथे कालिदासांनी "मेघदूतम' या खंडकाव्याची रचना केली. त्या रामटेक नगरातील जनतेला त्यांच्या नावाने होणाऱ्या महोत्सवापासून वंचित ठेवण्याचे महापाप कालिदास महोत्सव आयोजन समिती करीतच असते. नागपूरला मूठभर रसिकांच्या उपस्थितीत महोत्सव पार पाडून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या पर्यटन विकास महामंडळाला रामटेकसारख्या पर्यटनस्थळाचे वावडेच असल्याचे जाणवते.

क्‍लिक करा : खुश खबर... खुश खबर...गहू झाला स्वस्त

वास्तूचे "सोशल ऑडिट' व्हावे !
महाकवी कालिदासांच्या नावाने राज्य शासन रामटेकला संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना करून रामटेकचा आणि कालिदासांचा नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करते. मात्र, राज्यशासनाचे प्रशासन हा नातेसंबंध अव्हेरण्याचेच काम करीत असते. रामटेक येथे अंबाळा वळणाला मृगविहारजवळ पर्यटन विकास महामंडळाकडून भव्य वास्तू बनविली आहे. मात्र, ती तशीच धूळ खात पडून आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयाच्या निधीतून बनलेल्या वास्तूचा उपयोग होत नसेल तर अशी वास्तू का उभारली गेली, याचेही "सोशल ऑडिट' होणे अत्यावश्‍यक आहे. जर वास्तू निरुपयोगी ठरत असेल तर ती उभारण्याचा अट्टहास का करण्यात आला, याचाही उलगडा होणे गरजेचे आहे.

क्‍लिक करा : अरे भाउ ! तुकाराम मुंढे आहेत ते, जरा कडक सॅल्यूट मार ...

कुठे माशी शिंकली कोण जाणे !
कालिदास महोत्सव नागपूरला तीन दिवस व रामटेकला दोन दिवस आयोजित व्हावा, असा शासन निर्णय रामटेकचे माजी खासदार सुबोध मोहिते यांच्या प्रयत्नाने निर्गमित झाला आहे. त्याप्रमाणे विद्यमान आमदार आशीष जयस्वाल व माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात रामटेकला कालिदास महोत्सव आयोजित करून भारतातील अनेक संस्कृतींचा, कालिदासांच्या रचनांवर आधारित नाट्यकृतीतून कालिदासांचे साहित्याचा आस्वाद रामटेकच्या थोड्या थोडक्‍या नव्हे तर हजारोंच्या संख्येतील रसिकांना दिला होता. या महोत्सवासाठी आवश्‍यक निधी आमदार निधीमधून देण्याचा जयस्वाल यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ते साध्य करून घेतले होते. आता कुठे माशी शिंकली, असा प्रश्‍न करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalidas Festival, administration's dilemma?