कामगार रुग्णालयाला मिळाले सहा विशेषज्ज्ञ

केवल जीवनतारे
Tuesday, 6 October 2020

दशकापूर्वी येथील मनुष्यबळाची संख्या कमी झाल्यामुळे दोन वॉर्ड बंद पडले आहेत. मेजर ऑपरेशन थिएटर बंद पडण्याच्या स्थितीत होते. २८ जानेवारी २०१६ रोजी डॉ. मीना देशमुख यांनी या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली.

नागपूर : राज्य कामगार रुग्णालयात मागील तीन वर्षांपासून तीन महिला अधिकाऱ्यांनी कामगार रुग्णालयाला अत्याधुनिक रूप देण्याचा जणू संकल्पच केला आहे. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून स्थानिक पातळीवर एक दोन नव्हेतर तब्बल सहा विशेषज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. कामगार रुग्णालयात एकाचवेळी ६ तज्ज्ञ रुजू झाले. यामुळे कामगार रुग्णालयाचा दबलेला श्वास हळूहळू मोकळा होत आहे. 

उपराजधानीच्या सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. उपचारासाठी येणाऱ्या कामगार कुटुंबीयांवर उपचारादरम्यान केवळ रेफर टू मेडिकल अशी स्थिती आहे. मात्र या अवस्थेतून कामगार रुग्णालयाला बाहेर काढण्याचे काम येथील महिला राज करीत आहे.

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

दशकापूर्वी येथील मनुष्यबळाची संख्या कमी झाल्यामुळे दोन वॉर्ड बंद पडले आहेत. मेजर ऑपरेशन थिएटर बंद पडण्याच्या स्थितीत होते. २८ जानेवारी २०१६ रोजी डॉ. मीना देशमुख यांनी या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी म्हणून डॉ. जी. एस. धवड यांच्या कडे कार्यभार आला. तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.ए. चौधरी यांना कार्यभार दिला. या तीन महिला अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या साथीने कामगार रुग्णालयात नवीन मॉड्यूलर ऑपरेशन थिऐटर तयार केले. नुकतेच सीआर्म यंत्र रुग्णसेवेत दाखल झाले. येथे अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ नसल्यामुळे सीआर्म शोभेची वस्तू बनली असली, ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून देण्यात या महिला अधिकारी यशस्वी ठरल्या. आणि तज्ज्ञांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान तज्ज्ञांच्या मुलाखती झाल्या. एकाच दिवशी कामगार रुग्णालयात बधिरीकरण तज्ज्ञ, छातीरोग तज्ज्ञ, कान नाक घसा रोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, विकृती रोग तज्ज्ञ, शल्यचिकित्सक रुजू झाले. २० वर्षांनंतर कामगार रुग्णालयात सकारात्मक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. 

रुजू झालेले तज्ज्ञ 
कामगार रुग्णालयात कान नाक घसा रोग तज्ज्ञ, सामान्य शल्यचिकित्सक, बधिरीकरण तज्ज्ञ, छातीरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, असे सहा तज्ज्ञ रुजू झाले आहेत. दोन तज्ज्ञ लवकरच रुजू होतील. विशेष असे की, नुकतेच दै. सकाळने प्रकाशित केलेल्या बातमीचा संदर्भ देत लवकरच निवासी क्ष-किरण तज्ज्ञ नियुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मीना देशमुख म्हणाल्या. 

कामगार तसेच कामगार कुटुंबीयांना योग्य उपचार मिळावे हाच या योजनेचा हेतू आहे. विशेष असे की, मुंबईतील सर्व वरिष्ठांकडून सकारात्मक मदत मिळत आहे. यामुळेच चांगले बदल होत आहेत. 
-डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा रुग्णालय, नागपूर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamgar Hospital : Six specialists have been appointed