कन्नन गोपीनाथन म्हणतात, छुपा अजेंडा राबवतेय सरकार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

अजेंड्यातील गोष्टी करताना सरकार त्याला देशप्रेमाची जोड देते आणि जनतेला भावनिक करून मूर्ख बनवीत आहे, असा आरोप कलम 370 हटविल्याच्या विषयावरून राजीनामा देणारे माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी आज केला. 

नागपूर : केंद्र सरकारने अचानक नोटाबंदीचा निर्णय घेतला. घाईत जीएसटी लागू केला, एका दिवसात 370 कलम हटविले. आता अचानक नागरिकत्व सुधारणा कायदा तयार केला. हे निर्णय घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, हेच त्यांना माहिती नाही. त्याचे परिणाम काय होतील याचाही ते विचार करीत नाहीत. अनेकांना वाटते की, ते अर्थव्यवस्थेच्या समस्येवरून लक्ष वळविण्यासाठी निर्णय घेताहेत, परंतु ते त्यांचा छुपा अजेंडा राबवत आहेत.

अजेंड्यातील गोष्टी करताना सरकार त्याला देशप्रेमाची जोड देते आणि जनतेला भावनिक करून मूर्ख बनवीत आहे, असा आरोप कलम 370 हटविल्याच्या विषयावरून राजीनामा देणारे माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी आज केला. 

निमित्त होते संविधान जागर या कार्यक्रमाचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना आणि फ्रेंड्‌स ऑफ डेमॉक्रसीतर्फे वनामती येथील वसंतराव नाईक सभागृहातील कार्यक्रमात प्रमुख वक्‍ते म्हणून ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष भूषण वाघमारे तसेच अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना गोपीनाथन यांनी आजच्या सरकाच्याची स्थितीचे वर्णन केले. ते म्हणाले, गाडीच्या चाकामागे भुंकत धावणारे कुत्रे जिवाच्या आकांताने धावते. मात्र ते गाडीजवळ पोहोचल्यानंतर गाडी थांबविली की, चाकाजवळ गेल्यावर त्या कुत्र्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

काय करायचे हेच कळत नाही, हीच स्थिती सरकारची आहे. सध्याचे सरकार मोठे निर्णय घेऊन इतिहास निर्माण करण्याचा देखावा करीत आहे. मात्र, काय करायचे हेच त्यांना माहिती नाही, असेही ते म्हणाले. 
गोपीनाथन म्हणाले, कलम 370 हटविणे चुकीचा निर्णय आहे. काश्‍मिरींच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा अमानवीय प्रकार आहे. मात्र, अद्याप राजीनामा सरकारने स्वीकृत केलेला नाही.

सविस्तर वाचा - घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् कोसळले दुःखाचे डोंगर

राजीनाम्यानंतर प्रकाशझोतात आल्यानंतर प्रश्‍न विचारला आणि आज देशात सरकारवर प्रश्‍नांची बरसात जनता करीत आहे. हे सरकार फॅसिस्टवादी आहे, मात्र ते मूर्ख नक्कीच आहे. विविध पातळ्यांवर या सरकारने चुकीचे निर्णय घेतले. त्याचे परिणाम जनता भोगत आहे. 

 

चाणक्‍य हवाच कशाला

 गृहमंत्री अमित शहा यांना भाजपचे चाणक्‍य असे संबोधण्यात येते. मात्र, हे लक्षात घ्यायला हवे की चाणक्‍य चंद्रगुप्त मौर्याच्या काळात होता. ते साम्राज्य होते, तेथे सम्राट होता. सम्राटाला सल्ला देण्यासाठी चाणक्‍याची गरज होती. आज लोकशाही आहे, साम्राज्यावाद नाही. आपल्याला चाणक्‍याची नाही तर लोकशाही बळकट करणाऱ्या सरकारची गरज आहे. 
 
जनता प्रश्‍न विचारत आहे

 लोकशाहीत नागरिकांनी प्रश्न विचारणे हा केवळ अधिकार नसून जनतेचे कर्तव्य आहे. यामुळे सरकारचा विरोध करणे, शांतपणे निषेध करणे, मोर्चा काढण्याचा संविधानाने त्यांना दिलेला मूलभूत अधिकार आहे. मात्र केंद्रातील सरकारने मूलभूत अधिकारांवरच गदा आणली. कलम 370 हटविल्यावर कोणीही प्रश्‍न विचारत नव्हते. प्रश्‍न विचारणारे दहशतीत येत असल्याचे चित्र देशात तयार झाले. यामुळेच सनदी अधिकारी पदाचा राजीनामा दिला. मनाला समाधान मिळाले असून आता "सीएए' आणि "एनआरसी'वर जनता प्रश्न विचारू लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kannan Gopinathan says the government is implementing a hidden agenda