नागपुरातील कस्तुरचंद पार्क पुन्हा दुरवस्थेकडे! हायकोर्टाने मागितले महापालिका अन्‌ पोलिस विभागाला उत्तर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

मैदानाच्या मुद्यावर यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान, महापालिका आणि पोलिस आयुक्‍तांना या मैदानाच्या संरक्षणाबाबत आदेश दिल्या गेले आहेत. मात्र, तरीदेखील या मैदानाची दुरवस्था झाली आहे. त्यानुसार, महापालिका आणि पोलिस आयुक्तांना यावर उत्तर दाखल करायचे आहे.

नागपूर : कस्तुरचंद पार्कची बदलती परिस्थिती आणि याठिकाणी वाढणाऱ्या अतिक्रमणाच्या मुद्यावर नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना आणि पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्टीकरण मागितले आहे.

स्थानिक वृत्तपत्रामध्ये कस्तुरचंद पार्कच्या परिस्थितीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल उच्च न्यायालयाने घेतली. या मैदानाचा इतिहास बघता याचे योग्य संरक्षण व्हावे म्हणून नागपूर खंडपीठाने दाखल करून घेतलेली याचिका प्रलंबित आहे.

वाचा- कारवाईचा धाक दाखवून मागितली लाच, परंतु हवालदाराने दाखवली हिंमत आणि...

यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान, महापालिका आणि पोलिस आयुक्‍तांना या मैदानाच्या संरक्षणाबाबत आदेश दिल्या गेले आहेत. मात्र, तरीदेखील या मैदानाची दुरवस्था झाली आहे. त्यानुसार, महापालिका आणि पोलिस आयुक्तांना यावर उत्तर दाखल करायचे आहे. या मैदानाचा व्यावसायिक उपयोग होऊ नये म्हणून आणि त्याच्या सौंदर्यीकरणाच्या मुद्यावरून न्यायालयाने प्रशासनाला वेळोवेळी विविध आदेश दिले आहेत. महापालिकेने शपथपत्र दाखल करीत मैदानाच्या सौंदर्यीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे आणि हे कार्य गंभीरतेने करण्यात येत असल्याचे सांगितले होते.

मात्र, लॉकडाउनमुळे बदललेली परिस्थिती आणि नुकत्यात पडलेल्या पावसामुळे मैदानाचे संपूर्ण चित्र बदलले आहे. मैदानातील स्मारकामध्ये काही नागरिक वास्तव्यास आहेत. संपूर्ण मैदान चिखलमय झाले असून गवत उगवले आहे. यावरून प्रशासन आणि पोलिस प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. याला अनुसरून उच्च न्यायालयाने या प्रलंबित याचिकेवर सुनावणी सुरू केली आहे. पोलिस प्रशासन आणि महापालिकेला यावर 23 जूनपर्यंत उत्तर दाखल करायचे आहे. न्यायालयीन मित्र म्हणून ऍड. श्रीरंग भांडारकर यांनी, महापालिकेतर्फे ऍड. जेमिनी कासट यांनी, शासनातर्फे ऍड. डी. पी. ठाकरे यांनी बाजू मांडली.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasturchand park goiing towards destitution, Highcourt seek clarification from police,NMC.