Video : तारणहार म्हणवणाऱ्या जगदीश खरेंची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद; अभिनेता अक्षयकुमारने दिले होते पाच लाख

सतीश तुळसकर
Saturday, 5 December 2020

रात्र झाल्यामुळे जगदीश खरे माघारी नागपूरला निघाले. गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जगदीश खरे पत्नीसोबत उमरेड शहरात पुन्हा दाखल झाले. लगेच त्यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांनी आणलेल्या शोधकार्यास लागणाऱ्या साधनांचा वापर करीत दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेहाचा शोध घेऊन त्यास पाण्याबाहेर काढले.

उमरेड (जि. नागपूर) : बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास शहरापासून अगदी ४-५ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवापूर तलावाच्या पुलावरून तोल जाऊन पाण्यात बुडून २५ वर्षीय प्रवीण हंसराज मेश्राम या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने सूर्य मावळतीकडे जाईपर्यंत मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. गुरुवारी शोधकार्यास सुरुवात केली असता दोन तासात मृतदेह शोधण्याचे काम जगदीश खरे यांनी केले.

पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिस निरीक्षक विलास काळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने सूर्य मावळतीकडे जाईपर्यंत युवकाचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांना यश आले नाही. यानंतर सायंकाळी नागपूरहून जगदीश खरे यांना बोलविण्यात आले. परंतु, शोधकार्यासाठी लागणाऱ्या साधनांचा अभाव, थंडी आणि काळोख झाल्यामुळे शोधकार्य करणे अवघड झाले होते.

जाणून घ्या - पोलिसांनी चक्क शेतकर्‍यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव

रात्र झाल्यामुळे जगदीश खरे माघारी नागपूरला निघाले. गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जगदीश खरे पत्नीसोबत उमरेड शहरात पुन्हा दाखल झाले. लगेच त्यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांनी आणलेल्या शोधकार्यास लागणाऱ्या साधनांचा वापर करीत दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेहाचा शोध घेऊन त्यास पाण्याबाहेर काढले.

पोलिसांनी मृतदेह उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला असून, ती प्रक्रिया होताच मृताच्या नातेवाईकांना सोपविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक विलास काळे यांनी सांगितले.

हेही वाचा - शिवांभूचे नियमित सेवन करा अन् रोगप्रतिकारकशक्ती वाढवा; निलांबरी अभ्यंकर यांचा दावा

दोन हजार ५०० पाण्याखाली दबलेल्या मृतदेहांना बाहेर काढले

मृतदेहाचा शोध घेणाऱ्या खरे दाम्पत्यासोबत दै. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने चर्चा केली असता १९९४ पासून त्यांनी या समाजकार्याला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी दोन हजार ५०० पाण्याखाली दबलेल्या मृतदेहांना बाहेर काढले. तर नागपूरच्या गांधीसागर जलाशयात पडलेल्या एक हजार ५०० च्यावर लोकांचे जीव वाचवले.

लिम्का बुकमध्ये नावाची नोंद
त्यांच्या या समाजकार्याची दखल घेत २०१३ मध्ये त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुकमध्ये करण्यात आली. इतकेच नव्हे तर सिने अभिनेता अक्षयकुमार यांनी खरे दाम्पत्याला घर बांधण्यासाठी पाच लाखांची मदत केली. पण त्यांनी घर न बांधता शववाहिनी खरेदी केल्याची माहिती जगदीश खरे यांच्या पत्नीने दिली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The khare couple found the body of the youth in two hours