esakal | विशेष विमानाने दाखल झालेल्या संदीप पाटील यांच्या वादळी खेळीने विदर्भ घायाळ

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर संदीप पाटील यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे २९ वर्षापूर्वीचा विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश सामना गाजला होता. त्या सामन्याचे साक्षीदार असलेल्या अनेकांच्या स्मरणात तो अजूनही तसाच आहे. एक गाजलेला सामना या मालिकेत या सामन्याविषयी आज...

विशेष विमानाने दाखल झालेल्या संदीप पाटील यांच्या वादळी खेळीने विदर्भ घायाळ
sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : वर्ष नोव्हेंबर 1991-92. स्थळ विदर्भ क्रिकेट संघटनेचे सिव्हिल लाइन्स मैदान. विदर्भ-मध्य प्रदेश संघ आमनेसामने. चारदिवसीय रणजी सामन्याच्या शेवटच्या दिवसाचे अंतिम दोन तासांचे सत्र. विदर्भाने मध्य प्रदेशपुढे विजयासाठी 25 षटकांत 218 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्य आवाक्‍याबाहेरचे असल्याने सामना अनिर्णीत होणार हे निश्‍चित होते. मात्र, मध्य प्रदेशच्या खेळाडूंच्या मनात काही वेगळेच शिजत होते. आणि होऊ नये तेच घडले. संदीप पाटील व अमेय खुरासिया यांनी तुफानी फटकेबाजी करून मध्य प्रदेशला सात गड्यांनी अविश्वसनीय विजय मिळवून दिला. पाटील यांनी दिलेल्या जखमा अन्‌ वेदना वैदर्भी खेळाडूंच्या मनात आजही कायम आहेत.


29 वर्षांपूर्वीचा तो सामना अनेक अर्थाने स्मरणात राहणारा आहे. एकतर कर्णधार म्हणून प्रवीण हिंगणीकरचा पहिलाच सामना होता. शिवाय उभय संघांच्या अनेक खेळाडूंनी त्या सामन्यात वैयक्तिक विक्रम नोंदविले. मध्य प्रदेश संघात पाटील, खुरासियासह राजेश चौहान, प्रशांत द्विवेदी, देवाशीष निलोसे व सुनील लाहोरे यांच्यासारखे "मॅचविनर' होते, तर विदर्भ संघात अष्टपैलू हिंगणीकर, प्रशांत वैद्य, सुहास फडकर, उस्मान घनी, हेमंत वसू, समीर गुजर, मदन कावरे व प्रीतम गंधे या धुरंधरांचा समावेश होता.

वाचा - Video : फडकर यांनी दिला रणजीतील 37 वर्षांपूर्वीच्या अजरामर खेळीला उजाळा

हिंगणीकर यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सलामीवीर हिंगणीकर यांच्या 74 धावांच्या बळावर विदर्भ संघ कसाबसा 190 धावांपर्यंतच मजल मारू शकला. निलोसेने पाच व लाहोरेने चार बळी टिपले होते.
मध्य प्रदेशने 476 धावा करून पहिल्या डावात 286 धावांची विशाल आघाडी घेतली. द्विवेदी यांनी 114 आणि खुरासिया यांनी 99 धावा फटकावून विजयाचा पाया रचला.
विदर्भाच्या फलंदाजांनी पहिल्या डावातील चुकांपासून धडा घेत दुसऱ्या डावात 503 धावांचा डोंगर उभारून सामन्याची रंगत वाढविली. गुजर (322 चेंडूंत 221धावा) व घनी (199 चेंडूंत 140 धावा) यांनी शतके ठोकून मध्यप्रदेशपुढे 218 धावांचे लक्ष्य ठेवण्यात महत्त्वाची भूमिका वठविली. निलोसेने दुसऱ्याही डावात विदर्भाचे पाच फलंदाज बाद केले.

आणखी वाचा - गरज नसताना थ्रो केला अन्‌ विदर्भाने सामना गमावला!

...आणि व्हीसीएवर अवतरले वादळ !

विजयासाठी षटकामागे जवळपास नऊ धावांचे आव्हान कोणत्याही संघासाठी धावपळ करत एव्हरेस्ट शिखर चढण्यासारखे होते. मात्र, ही अशक्‍यप्राय कामगिरी त्या दिवशी मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी करून दाखविली. 38 धावांमध्ये सलामी जोडी माघारी परतल्यानंतर खुरासिया व "पीचंहिटर' निलोसेने 93 धावा जोडून विदर्भाच्या "ड्रेसिंग रूम'मध्ये चिंता वाढवली. निलोसे बाद झाल्यावर मैदानात उतरलेल्या संदीप पाटीलने त्यानंतर घणाघाती प्रहार करून सामन्याचे चित्रच पालटविले. मुंबईकर असला तरी त्या मोसमात संदीप पाटील मध्य प्रदेशसाठी खेळत होते. या सामन्यासाठी खास विमानाने नागपुरात दाखल झालेले पाटील यांनी टी-20 स्टाइलमध्ये चौकार-षटकारांची तुफान आतषबाजी करत 15 चेंडूंपूर्वीच संघाला चित्तथरारक विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा - वेळेवर धावून आला 'परमेश्‍वर' म्हणून वाचला बापलेकीचा जीव...

पाटील यांनी प्रशांत वैद्यसह विदर्भाच्या सर्वच गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. ओल्ड ट्रॅफोर्डवर इंग्लंडच्या बॉब विलिसला लागोपाठ चार षटकार लगावणाऱ्या पाटील यांनी प्रशांतच्या एकाच षटकात सलग पाच चौकार हाणले. त्यानंतर प्रीतम गंधेलाही तीन षटकार खेचून विदर्भाच्या ड्राच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फेरले. उल्लेखनीय म्हणजे तीनपैकी एक षटकार चक्क बिशप कॉटन शाळेच्या मैदानावर जाऊन आदळला. पाटील यांनी अवघ्या दहा-बारा चेंडूंतच नाबाद 40 धावा केल्या. पण, त्याचा तो रौद्रवतार वैदर्भींना चांगलाच घायाळ करून गेला. खुरासियानेही 99 धावांवर नाबाद राहून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. या अनपेक्षित पराभवाने गुजरच्या सर्वोच्च द्विशतकी खेळीवर आणि घनींच्या पहिल्यावहिल्या शतकावर पाणी फिरले. वैदर्भी खेळाडू व चाहत्यांसाठी तो पराभव फारच वेदनादायी होता. विशेषतः पहिल्यांदाच नेतृत्व करणाऱ्या कर्णधार हिंगणीकरांसाठी कधीही न विसरता येणारा क्षण होता.