गरज नसताना 'थ्रो' केला अन्‌ विदर्भाने सामना गमावला!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : तारीख 17 नोव्हेंबर 1998. स्थळ विदर्भ क्रिकेट संघटनेचे सिव्हिल लाइन्स मैदान. विदर्भ-राजस्थान चारदिवसीय रणजी सामना. वेळ सायंकाळी सहाची. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर हव्या होत्या तीन धावा. चेंडू विदर्भाचा फिरकीपटू प्रीतम गंधेच्या हातात. समोर राजस्थानचा तळाचा (टेलेंडर) फलंदाज कुलदीप सिंग. प्रीतमने टाकलेला चेंडू कुलदीपच्या पॅडवर आदळला. पायचीतचे जोरदार अपील झाले. एक धाव, दुसरी धाव अन्‌ तिसरीही धाव घेत राजस्थानने "तो' थरारक सामना अवघ्या दोन गड्यांनी जिंकून विदर्भाच्या आशेवर पाणी फेरले.

गरज नसताना केलेल्या "ओव्हर थ्रो' ने सामना हातून निसटल्याचे शल्य आजही वैदर्भी खेळाडूंच्या मनात आहे. विदर्भाच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक सामने झाले, ज्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा झाली. विदर्भ-राजस्थान सामना त्यापैकीच एक. रणजी करंडक (मध्य विभाग) क्रिकेट स्पर्धेतील हा सामना राजस्थानचा कर्णधार गगन खोडा आणि विदर्भाचा व्यावसायिक खेळाडू लालचंद राजपूत यांच्या नेतृत्वाची परीक्षा घेणारा होता. राजस्थान संघात खोडा, कसोटीपटू आशीष कपूर, राहुल कांवत, पी. कृष्णकुमार व शमशेरसिंगसारखे दर्जेदार खेळाडू होते. तर घरच्या मैदानावर खेळणाऱ्या विदर्भ संघात राजपूत, उस्मान गनी, प्रीतम व उल्हास गंधे, परिमल हेडाऊ, योगेश घारेसारखे अनुभवी खेळाडू होते. फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने घारेच्या अर्धशतकाच्या बळावर 189 धावा फळ्यावर लावल्या.

प्रत्युत्तरात राजस्थानचा डाव अवघ्या 133 धावांवर गडगडला. दिलीप परतेकीने चार व प्रीतमने तीन बळी टिपून विदर्भाला 56 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दिवशी वरुणराजाने अचानक हजेरी लावल्याने दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आघाडीवर समाधान न मानता विदर्भाने सामना निकाली काढण्याच्या उद्देशाने दुसऱ्या डावात पटापट धावा काढत 7 बाद 190 धावांवर डाव घोषित केला आणि राजस्थानपुढे निर्णायक विजयासाठी 247 धावांचे अशक्‍यप्राय आव्हान ठेवले. खेळपट्टीवर चेंडू हातभर वळत असल्याने लक्ष्य सोपे नव्हते. त्यामुळे सामना रोमांचक ठरेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. दोन्ही संघांना विजयाची समसमान संधी होती. अटीतटीच्या क्षणी मानसिक कणखरतेची सत्वपरीक्षा होती. त्यात राजस्थानने बाजी मारली.

तो "क्‍लायमॅक्‍स सिन'...
सामन्याचा "क्‍लायमॅक्‍स सिन' क्रिकेटपटू व प्रेक्षकांच्या उरात धडकी भरविणारा होता. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. "नॉन ट्रायकर'वर शतकवीर राहुल कांवत, तर मैदानात नुकताच उतरलेला अननुभवी कुलदीप सिंग "स्ट्राईक'वर होता. कर्णधार राजपूतने अपवाद वगळता सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये आणले. चेंडू अनुभवी प्रीतमच्या हातात होता. मैदानावरील जायका एंडकडील स्टॅण्डमधील विदर्भाचे समर्थक, पत्रकार वैदर्भी खेळाडूंचा उत्साह वाढवित होते. प्रीतमने चेंडू टाकला, धाडकन कुलदीपच्या पॅडवर आदळला. क्षेत्ररक्षकांनी पायचीत बादचे अपील केले. चेंडू शॉर्ट लेगकडे गेल्यानंतर कुलदीप व कांवतने एक धाव घेतली. यष्टिरक्षक सदाशिव अय्यरने कारण नसताना चेंडू स्टंपवर फेकला. अडवायला कुणीच नसल्याने चेंडू डीप कव्हरकडे गेला.

तिथे उभ्या उल्हासने "अंडर आर्म थ्रो' करत चेंडू अमोल जिचकारकडे दिला. मात्र, चेंडू त्याच्याही हातून निसटला आणि सीमारेषेकडे गेला. या प्रयत्नात रावत-कुलदीप जोडीने तिसरीही धाव घेऊन राजस्थानला दोन गड्यांनी थरारक व ऐतिहासिक विजय मिळवून दिला. सामना संपला तेव्हा सायंकाळचे सहा वाजले होते. उल्लेखनीय म्हणजे, अंधारामुळे व्हीसीएवरील लाइटही सुरू करावे लागले होते. गरज नसताना विनाकारण "थ्रो' केल्यामुळे विदर्भाला तो सामना गमवावा लागला. क्षुल्लक चुकीमुळे पराभव झाल्याचे दु:ख आजही वैदर्भी खेळाडूंच्या मनात आहे. सामन्याचा साक्षीदार राहिलेले उल्हास गंधे व मनीष दोशीने आपल्या भावना "सकाळ'कडे बोलूनही दाखविल्या. आमच्या कारकिर्दीतील ते एक वाईट स्वप्न होते, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com