मरावे परी अवयवरुपे उरावे

vimal shrivas.jpg
vimal shrivas.jpg

नागपूर : पंच्याहत्तर वर्षांचं वय असलेल्या विमल प्रसाद श्रीवास यांना मेंदूमृत ठरवण्यात आल्यानंतर त्यांच्या अवयवदानातून दोघांना उपराजधानीतील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये जीवनदान मिळाले. अवयवदान करणाऱ्या व्यक्‍तीचे वय जास्त असल्याने त्यांच्या दोन्ही किडनी एकालाच देण्यात आल्याची मध्यभारतातील दुसरीच वेळ आहे. न्यू इरा हॉस्पिटलमधील अवयवदान शस्त्रक्रियेची ही पहिली वेळ असून, अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून किडनी प्रत्यारोपण करून 46 वर्षीय व्यक्‍तीला जीवदान मिळाले. तर यकृतदानातून जम्मू-काश्‍मीरमधील युवकाला पुन्हा जग बघण्याची संधी मिळाली.

भरतवाडा गुलमोहरनगर येथील रहिवासी विमल प्रसाद श्रीवास यांना सात मुलं आहेत. त्यांची 18 डिसेंबरला प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अतिरक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती अतिशय खालावली. उपचाराला प्रतिसाद मिळत नसून मेंदुमृत असल्याचे निदान डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. पराग मून, डॉ. साहिल बन्सल, डॉ. अमोल कोकस यांनी केले. आणि तसे नातेवाईकांना सांगण्यात आले. विमल यांचे प्रसारमाध्यमात काम करणारे पुत्र ओंकार श्रीवास, मुलगी माया निमपुरे यांचे डॉक्‍टरांनी अवयवदानासाठी समुपदेशन केले. नातेवाईकांनी अवयवदान करण्यास परवानगी दिल्यानंतर डॉक्‍टरांनी तत्काळ विभागीय अवयवदान समिती अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या परवानगीनंतर नववर्षातील पहिल्या अवयवदानातून दोघांना जीवनदान मिळाले.
दोन्ही किडनी एकाच रुग्णामध्ये प्रत्यारोपित करण्याची शस्त्रक्रिया डॉ. आनंद संचेती यांच्या मार्गदर्शनात डॉ. निधेश मिश्रा, डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. रवि देशमुख, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. अमित देशपांडे, डॉ. अमोल कोकस, डॉ. अश्‍विनी चौधरी यांनी केली तर तर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्‍सेना, डॉ.साहिल बन्सल, डॉ. सुशांत गुल्हाने यांनी केली.

उपराजधानी बनतेय अवयवदानाचे हब


मेडिकलच्या माजी अधिष्ठाता तसेच विभागीय अवयवदान समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी यांनी पुढाकार घेतल्यानंतर उपराजधानीत अवयवदानाचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू असून उपराजधानीची अवयवदानाचे हब बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 2019 मध्ये 18 मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान करण्यात आले. या अवयवदानातून शहरात 28 व्यक्‍तींना किडनी दान करून नवजीवन देण्यात आले. तर 16 व्यक्‍तींना यकृत दानातून जीवनदान मिळाले. तिघांना हृदयदान करण्यात आले. परराज्यातील दोघांना फुप्फुसदान करून जीवनदान दिले. सहा जणांच्या बुब्बुळदानातून 12 जणांना दृष्टी मिळाली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com