संत्र्याच्या हंगामात नागपूरहून धावणार किसान रेल, काय सांगतात रेल्वेमंत्री

योगेश बरवड
Monday, 5 October 2020

महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारदरम्यान पहिली किसान रेल्वे चालविण्यात आली. या सेवेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील विविध भागात संत्रा वाहतुकीसाठी नागपूरहून किसान रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

नागपूर  ः संत्र्याचा हंगाम सुरू होताच देशातील विविध भागात संत्रा वाहतुकीसाठी नागपूरहून किसान रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सुतोवाच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले. गोयल यांनी नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नव्या कृषी कायद्यांचे समर्थन केले. यादरम्यान त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितार्थ किसान रेल्वे चालविण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारदरम्यान पहिली किसान रेल्वे चालविण्यात आली. या सेवेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील विविध भागात संत्रा वाहतुकीसाठी नागपूरहून किसान रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. हंगामानुसार फळे आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी रेल्वे आणि कृषी मंत्रालय किसान रेल कोरिडॉरसाठी प्रयत्नशील आहे. 

नाशिवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी वातानुकूलित कोच सुरू करण्यासाठी कृषी मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. कृषी उत्पादनांचा अपव्यय हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गोदामे विकसित करण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

संसदेने पारित केलेल्या कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून येईल. त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल आणि जीवनमान उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या प्रयत्नामुळे शेतमाल विकण्यासंदर्भात अनेक दशकांपासून असलेल्या बंधनातून शेतकरी मुक्त झाले आहेत.

 त्यांच्या आणि देशाच्या कृषी क्षेत्राच्या जलद विकासाचे मार्ग खुले होणार आहेत असेही त्यांनी नमूद केले. दरांमध्ये होणाऱ्या विपरीत चढउतारांपासून संरक्षण देण्याचे काम नवीन कृषी विधेयके करतील, तसेच शेतकऱ्यांना आपल्याला हवे असलेले दराचे फायदे मिळवण्याचे स्वातंत्र्य असेल, असेही ते म्हणाले. 

संपादन  : अतुल मांगे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kisan Rail will run from Nagpur during the orange season