बाधितांच्या संख्येपुढे दम टाकताहेत जिल्ह्यातील कोविड रुग्णालये, उपचारांच्या ‘ऑक्सिजनची गरज

file
file

हिंगणा (जि.नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड हॉस्पिटल तोकड्या संख्येत आहेत. रुग्णालयात  बेडची क्षमता असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांअभावी उपचार करण्यास असक्षम ठरत आहेत. रुग्णांची मृत्यूसंख्या वाढत असतानाही नवीन कर्मचारी भरती संदर्भात शासनाची भूमिका सुस्त आहे. साहित्य खरेदीवर लाखोंचा खर्च करण्यात येत आहे. मात्र वैद्यकीय कर्मचारीच पुरेसे नसल्याने कोविड रुग्णालय आता ऑक्सिजनवर असल्याचे दिसून येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला ग्रहण
जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात शालिनीताई मेघे हॉस्पीटल व लता मंगेशकर हॉस्पिटल उपलब्ध आहे. उमरेडला एक, कामठी येथे तीन खासगी कोविड रुग्णालय सद्यस्थितीत कार्यरत आहेत. १३  तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२,५०० हजाराच्या घरात पोहचली आहे. मृत्यू संख्येचा आकडाही ३३० पार केला आहे. ग्रामीण भागात ४,६६१ अॅक्टीव रूग्ण संख्या आहे. अशा परिस्थितीत आता जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा तारेवरची कसरत करून कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहे. लता मंगेशकर रुग्णालयात ४५० तर शालिनीताई मेघे रूग्णालयात ३५० बेडचे कोविड रुग्णालय अद्यावत स्थितीत आहे. ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता आता ही रुग्णालये अपुरे पडू लागले आहे. दोन्ही रूग्णालयात केवळ १५० कोरोना बाधित रुग्णांना भरती केले जात आहे. बेडची क्षमता उपलब्ध असतानाही वैद्यकीय कर्मचाऱ्यांअभावी ६० बेड शिल्लक ठेवण्यात येत आहेत. रुग्णालयात काम करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारीच उपलब्ध नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे.

वस्तुस्थिती शासनापुढे मांडणे गरजेचे
राज्य शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडून कोविड रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लाखो रुपयांचा निधी देण्यात येत आहे. या निधीतून केवळ साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोविड  रुग्णालयात आयएएस समकक्ष अधिकाऱ्याला कार्यवाह संचालक म्हणून नियुक्त केले आहे. अशा जबाबदार अधिकाऱ्यांनी कोविड रुग्णालयातील वस्तुस्थिती शासनापुढे मांडणे गरजेचे आहे. मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसंदर्भात या अधिकाऱ्‍यांनीही कुठलीही स्पष्टता शासनाकडे केली नाही. जिल्हाधिकारी महोदयांनीही वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास कुठलेही धोरण अवलंबिले नाही. यामुळे कोविड रुग्णालयातील ६० टक्के बेड शिल्लक राहात आहेत. ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने रुग्णांचा जीव जात आहे.

जिल्हाधिकारी महोदय, तातडीने घ्या निर्णय !
हिंगणा तालुक्यात काळमेघ डेंटल कॉलेजच्या रुग्णालयचा  समावेश कोविडच्या यादीत आहे. मात्र रुग्णांना बेड उपलब्ध होत  नसतानाही या रुग्णालयात कोवीड रुग्णालय का सुरू करण्यात आले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कोविड रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना न केल्यास हजारो कोरोना बाधित रुग्णांना बेड उपलब्ध होण्याची सुद्धा सुतराम शक्यता नाही. जिल्हाधिकारी महोदयांनी याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची जीव वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, हे येणारा काळच सांगेल.

रुग्णांचा जीव वाचवणे हे प्राथमिक धोरण
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोवीड रुग्णालयांची संख्या कमी आहे. बेडची क्षमता जास्त असताना रुग्ण त्याप्रमाणात भरती केले जात नाही. यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिरात देण्यात आली आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही.कोवीड रुग्णालयात बेडची  क्षमता वाढविण्यासंदर्भात धोरण तयार केले जात आहे. याची अंमलबजावणी लवकरच होईल. ग्रामीण भागातील रुग्णांचा जीव वाचवणे हे प्राथमिक धोरण ठरविण्यात आले आहे.
देवेंद्र पातुरकर
जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com