पाच जणांचा जीव घेणाऱ्या "त्या' चा मृत्यू ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या कोलारा परिसरात चार महिन्यात पाच जणांचे बळी घेतल्याने वाघाला जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी दिले होते. वन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अतिशय शिताफीने त्याला 10 जून रोजी जेरबंद केले होते. त्याला 11 जूनला नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात हलविण्यात आले. प्राणीसंग्रहलाय प्राधिकरणाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्याला क्वॉरंटाईन केले होते. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. 

 
नागपूर :  ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या कोलारा परिसरात पाच जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा (के टी 1) गोरेवाडा बचाव केंद्रात क्वॉरंटाईन असताना मृत्यू झाला. आज सकाळी वाघाच्या मृत्यू माहिती पुढे येता वनविभागात खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी सापाच्या चाव्यामुळे मरण पावल्याचा अंदाज प्रथम दर्शनी व्यक्त केला जात आहे. 

ताडोबा प्रकल्पाच्या कोलारा प्रवेशद्वारालगत असलेल्या जंगलात गावकरी सरपण आणि तेंदू पाने गोळा करण्यासाठी जात असतात. यातूनच वाघाचे हल्ले झाले होते. सलग चार महिन्यात पाच जणांचे बळी घेतल्याने त्या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी दिले होते. त्यानुसार वन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अतिशय शिताफीने त्याला 10 जून रोजी जेरबंद केले होते. त्यानंतर त्याला 11 जूनला नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात हलविण्यात आले. प्राणीसंग्रहलाय प्राधिकरणाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्याला क्वॉरंटाईन केले होते. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. 

हेही वाचा : रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविण्यासाठी चहाचा झाला मोठा वापर, आणि आली ही बातमी... 

जेरबंद केल्यापासूनच तो अतिशय आक्रमक होता. गोरेवाड्यात आणल्यानंतर सलग तीन दिवस त्याने काहीच खाल्ले नव्हते. त्यानंतर मास खाण्यास सुरुवात केली होती. आज सकाळी गोरेवाड्यातील कर्मचारी त्या वाघाच्या पिंजऱ्याजवळ गेले. दरम्यान, के.टी 1 वाघ हा हालचाल करीत नसल्याचे लक्षात आले. लगेच त्यांनी ती माहिती वनाधिकाऱ्यांना दिला. पशुवैद्यकीय अधिकारी आणि वनाधिकारी गोरेवाड्यात पोहचले असून वाघाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण कळू शकणार आहे. प्रथम दर्शनी सापाच्या चाव्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. 

पाच जणांचे घेतले होते बळी 
फेब्रुवारी ते सात जूनपर्यंत कोलारा, वामनगाव, सातारा तुकूम या भागात वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचे बळी गेले. यामुळे लोकांत मोठा असंतोष निर्माण झाला. आणि यातूनच वाघाला पकडण्याची किंवा मारण्याची मागणी जोर धरू लागली. लोकांचा असंतोष लक्षात घेता प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी या वाघाला बेशुद्ध करून बंदिस्त करण्याचे आदेश ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाला दिले. KT-1 नावाचा हा वाघ असून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून त्याची ओळख पाठवण्यात आली. या वाघाची वागणूक अस्वाभाविक असल्याचंही दिसून आल्याने त्याला बंदिस्त करण्याचे हे आदेश दिले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KT-1 Tiger Death in Gorewada