...अन्‌ कुटुंबीय म्हणाले तुम्हीच करा अंत्यसंस्कार; फक्‍त येताना अस्थी घेऊन या

अनिल कांबळे
शुक्रवार, 5 जून 2020

सतत चालत असल्यामुळे प्रत्येक जण थकला होते. त्यामुळे डीहाईड्रेशनचा त्रास होत होता. त्यांच्यापैकी एकाचा वर्धा येथे मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला नेण्यात आल्यावर मृत घोषित करण्यात आले. त्याची कोविड-19 ची चाचणी निगेटिव्ह आली. शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह त्यांच्यासोबत असलेल्या मजुरांकडे सोपविण्यात आला. 

नागपूर : लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेले 16 मजूर पुणे शहरातून झारखंडला पायी निघाले होते. रस्त्यातच एका मजुराचा डीहायड्रेशनमुळे मृत्यू झाला. आता मित्राचा मृतदेह गावी कसा न्यावा, याची चिंता मजुरांना पडली. त्यांनी मृत मित्राच्या कुटुंबीयांसोबत फोनवर चर्चा केली. त्यांनी परस्पर अंत्यसंस्कार करण्यासाठी होकार दिला. त्यामुळे मृतदेहावर वर्धा येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याची अस्थी घेऊन मजूर पुन्हा पायी निघाले. एका संस्थेने ही माहिती नागपूरचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त डॉ. नीलेश भरणे यांना दिली अन्‌ पुढील घटनाक्रम घटला... 

लॉकडाउनमुळे उत्पन्नाचा कोणताही मार्ग नसल्याने 16 मजुरांचा गट पुण्याहून झारखंडपर्यंत पायी निघाला होता. पुण्यापासून 700 किमी अंतर चालून झाल्यावर हे मजूर एक जून रोजी वर्धा शहरात पोहोचले. सतत चालत असल्यामुळे प्रत्येक जण थकला होते. त्यामुळे डीहाईड्रेशनचा त्रास होत होता. त्यांच्यापैकी एकाचा वर्धा येथे मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला नेण्यात आल्यावर मृत घोषित करण्यात आले. त्याची कोविड-19 ची चाचणी निगेटिव्ह आली. शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह त्यांच्यासोबत असलेल्या मजुरांकडे सोपविण्यात आला.

हेही वाचा - मुंबईतून निसर्ग वादळ जात नाही तोच दुसरं मोठं राजकीय वादळ

हा प्रकार नागपूरचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त डॉ. नीलेश भरणे यांना कळला. त्यांनी लगेच जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून या मजुरांना झारखंडला जाण्याची व्यवस्था करून दिली. मात्र, मृत पावलेल्या मजुराच्या कुटुंबीयांनी अंतिम दर्शनही घेता न आल्याची खंत व्यक्‍त केली. 

लगेच घेतली दखल

स्थलांतरितांना बस, ट्रेन, रुग्णवाहिकेमधून त्यांच्या घरी पाठविण्याचे कामात अपर पोलिस आयुक्त डॉ. नीलेश भरणे समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांनी तत्काळ स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून मजुरांना वर्धा येथून बसने नागपूरला आणले. शेल्टर होम येथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांना जेवण देण्यात आले तसेच त्यांचे समुपदेशनही करण्यात आले. रेल्वेचे समन्वय अधिकाऱ्यांची विशेष परवानगी घेऊन सर्व 15 स्थलांतरितांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्याच दिवशी झारखंडला जाण्याची व्यवस्था केली.

क्लिक करा - तिचा मृतदेह रुग्णवाहिकेतून काढत घराच्या अंगणात ठेवला अन्‌ रडत रडत पळून गेला... 

दुःख माझ्यासाठी असहनीय
कोरोनाच्या काळात अनेकांवर संकट कोसळले. त्यामुळे संकटात मदत करणे हे खाकीचे कर्तव्य आहे. त्याच भावनेने माहिती मिळताच त्या मजुरांना वर्धेतून नागपुरात आणले. त्यांचे समुपदेशन करून घरी जाण्याची व्यवस्था केली. एका मजुराचा पायी चालण्यामुळे मृत्यू झाल्याचे दुःख माझ्यासाठी असहनीय होते. 
- डॉ. नीलेश भरणे, 
अप्पर पोलिस आयुक्‍त.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A laborer died on the road while walking