तिचा मृतदेह रुग्णवाहिकेतून काढत घराच्या अंगणात ठेवला अन्‌ रडत रडत पळून गेला...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

रविवारी सकाळच्या सुमारास गावापासून काही अंतरावर पाटणाई ते माथार्जुन मार्गावर पोलिस जात असताना त्यांना तिथे दिलीप गंभीर अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याने त्याने विषारी द्रव्य प्राषण केल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दिलीपला तातडीने दवाखान्यात भरती केले. मात्र, काही वेळातच त्याचीही प्राणज्योत मालवली.

झरी जामणी (जि. यवतमाळ) : अलीकडचे तरुण-तरुणी प्रेमात आकंत बुडतात. प्रेमाच्या आणाभाका घेतात आणि काही महिन्यातच एमेकांच्या दूर होतात. मात्र, एकत्र आयुष्य जगण्याची शपथ घेणाऱ्या लैलाच्या मृत्यूनंतर मजनूने सुद्धा दुसऱ्या दिवशी मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्‍यामधील माथार्जुन येथे घडली. 

प्राप्त माहितीनुसार, दिलीप कुमरे (21) हा माथार्जून येथील रहिवाशी आहे. त्याचे गावातीलच एका मुलीशी एका वर्षापूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यांच्या प्रेमात भेटीगाठी सुरू झाल्या. काही दिवसांनी गावात कुणकुण सुरू झाली. अखेर हे संबंध मुलीच्या कुटुंबीयांना माहित पडले. यानंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला भेटायला मनाई केली. तो मुलीला घेऊन हैदराबाद येथे पळून गेला.

हेही वाचा - रस्त्यावर फिरत होत्या आठ तरुणी, पोलिसांनी विचारताच ऐकविली अंगावर काटा आणणारी आपबीती

मुलीला मधुमेहाचा आजार आहे. तिला रोज दोन वेळा औषध घ्यावे लागत होते. मात्र, मुलीने औषधे सोबत नेले नाही. पळून गेल्यावर तिला शुगरचा त्रास होऊ लागला. त्या काळात तिला औषधी मिळाली नाही. दरम्यान, मुलीची तब्येत खालावत गेली. अखेर तिची परिस्थिती गंभीर झाली. दिलीपने आजारी असलेल्या प्रेयसीला हैद्राबाद येथे रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरू होता. 

मात्र, उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालावली. तिच्या मृत्युमुळे हादरलेला दिलीपने हताश होऊन गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. एका रुग्णवाहिकेत तिचे शव टाकून तो माथार्जूनकडे रवाना झाला. 31 मे च्या रात्री 2.30 वाजताच्या सुमारास तो माथार्जून येथील स्वतःच्या घरी पोहोचला. मुलाने अत्यंत खिन्न होऊन तिचे प्रेत रुग्णवाहिकेतून बाहेर काढत घराच्या अंगणात ठेवले व रडत रडत तिथून पळून गेला. 

रविवारी सकाळच्या सुमारास गावापासून काही अंतरावर पाटणाई ते माथार्जुन मार्गावर पोलिस जात असताना त्यांना तिथे दिलीप गंभीर अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याने त्याने विषारी द्रव्य प्राषण केल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दिलीपला तातडीने दवाखान्यात भरती केले. मात्र, काही वेळातच त्याचीही प्राणज्योत मालवली. सुखी संसाराची स्वप्न बघणाऱ्या प्रेमीयुगुलांचा संसार केवळ आठवडाभरापुरता ठरला. दोघांच्याही मृत्युमुळे परिसरातील लोक हादरले असून, त्यांच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

क्लिक करा - नवऱ्याला सोडले, प्रियकराला गाठले, आठ वर्षांनंतर त्यानेही नाकारले आता...

भेटीगाठीवर आली होती बंधने

दिलीपचे गावातीलच एका मुलीशी एका वर्षापूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यांच्या प्रेमात भेटीगाठी सुरू झाल्या. काही दिवसांनी गावात कुणकुण सुरू झाली. अखेर हे संबंध मुलीच्या कुटुंबीयांना माहित पडले. यानंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला भेटायला मनाई केली. यामुळे दोघांच्या भेटीगाठीवर बंधने आली होती. विरहामुळे दोघांचाही जीव कासावीसा होत होता. अखेर त्या दोघांनी हैद्राबाद येथे पळून जाण्याचा निर्णय घेतला. 23 मे रोजी या प्रेमीयुगुलाने गावातून पलायन केले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलगी अल्पवयीन असल्याने आईने याबाबत पाटण पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली. त्यानुसार मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दोघांचीही कोरोनाची चाचणी निगेटिव्ह

पोलिसांनी पुढील कार्यवाही करीत प्रेमीयुगुलांचे प्रेत तपासणीसाठी झरी येथे पाठवले. ते दोघेही हैद्रबाद येथील रेड झोनमधून आल्याने कोरोनाचा संसर्ग होऊन जीव जाण्याची शक्‍यता अधिक असल्याने झरी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे कोरोनाचे नमुने घेतले. दोघांचेही नमुने वसंतराव नाईक महाविद्यालय यवतमाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सदर घटनेचा तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश मोरे जमादार अभिमान आडे, पिदूरकर, संदीप सोयाम, अंकुश दरबसतेवार, अंकुश पातोडे करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boyfriend commits suicide after girlfriend death at Yavatmal