विलगीकरणातील नागरिकांच्या जेवणात अळ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

सकाळीही वेळेवर जेवण मिळाले नसल्याचे एका महिलेने सांगितले. विलगीकरणातील गैरसोयीबाबत कुणाकडे तक्रार करावी, येथे कुणीही अधिकारी नाही, अशी खंत काही नागरिकांनी व्यक्त केली

नागपूर ः वेळेवर जेवण मिळत नसल्याने संतप्त झालेल्या व्हीएनआयटी येथील विलगीकरणातील नागरिकांना आज जेवणातील डाळीत चक्क अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जेवणाला हातही लावला नसून पोळ्या जाड्या असल्याने चावताना कसरत करावी लागल्याचे येथील काही नागरिकांनी नमूद केले. 

व्हीएनआयटी येथे जवळपास चारशे नागरिक विलगीकरणासाठी आहेत. नुकताच येथील नागरिकांनी वेळेवर जेवण, नाश्‍ता मिळत नसल्यावरून येथील जबाबदार अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. आज येथील नागरिकांना रात्रीचे जेवण देण्यात आले. जेवणाची थाळी उघडताच अनेकांनी जेवण्यास सुरुवात केली. मात्र, काही नागरिकांना जेवताना वरणात अळ्या आढळून आल्या. त्यामुळे नागरिकांनी लगेच जेवण नाकारले.

करावे तरी काय? बाजार समितीतही आता कोरोनाचा प्रवेश!

रात्री दहा वाजेपर्यंत नागरिकांनी जेवणाला हातही लावला नाही. याशिवाय जेवणात पोळ्यांची जाडी अधिक असल्याने वृद्ध व चिमुकल्याने चावताना त्रास होत असल्याचे एका नागरिकाने नमूद केले. त्यामुळे येथे उपचारासाठी आणले की उपाशी मारायला? असा संतप्त प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला. येथे प्राथमिक सोयीसुविधाच नसल्याचे मागील मंगळवारी संतप्त नागरिकांच्या व्हायरल व्हिडिओमुळे पुढे आले. येथे आलेल्या नागरिकांनीच येथील असुविधांचे पितळ उघडे पाडले.

येथे केवळ दोनच प्रसाधनगृहे असून अनेकांना नैसर्गिक प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी काहींची तब्येत बिघडल्याचे येथील काही नागरिकांनी आप्तांना फोनवरून सांगितले. व्हायरल झालेल्या व्हिडिओतून एका महिलेने कुठल्याच सुविधा नसल्याचे स्पष्ट केले. आज सकाळीही वेळेवर जेवण मिळाले नसल्याचे एका महिलेने सांगितले. विलगीकरणातील गैरसोयीबाबत कुणाकडे तक्रार करावी, येथे कुणीही अधिकारी नाही, अशी खंत काही नागरिकांनी व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Larvae in the food of the people isolated