esakal | वकील तरुणीला पोलिस ठाण्यात मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल  
sakal

बोलून बातमी शोधा

Lawyer young woman beating at police station

अंकिता शाह या तुलसी अपार्टमेंट, टेलिफोन एक्सचेंज चौकात राहतात. मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी त्या अनेक वर्षांपासून लढा देत असून, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांना अन्न व पाणी देण्याची मोठी समस्या निर्माण झाली.

वकील तरुणीला पोलिस ठाण्यात मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल  

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर  : मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या व माहिती अधिकार कार्यकर्त्या अ‍ॅड. अंकिता शाह यांना लकडगंज पोलिस ठाण्यात मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिस वर्तुळात पोलिसांच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता शाह या तुलसी अपार्टमेंट, टेलिफोन एक्सचेंज चौकात राहतात. मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी त्या अनेक वर्षांपासून लढा देत असून, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांना अन्न व पाणी देण्याची मोठी समस्या निर्माण झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या कडेला कुत्र्यांसाठी एक पात्र ठेवले. या पात्रात त्या अन्न व पाणी कुत्र्यांना ठेवत होत्या. 

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप
 

२४ मार्चला दुपारी एक वाजता त्या पतीसह कुत्र्यांना अन्न व पाणी देण्यासाठी गेल्या असता इमारतीमध्ये राहणाऱ्या करण सचदेव यांनी पात्राला लाथ मारली. २५ मार्च २०२० ला संध्याकाळी ७.३० वाजता असाच प्रकार घडल्याने त्या लकडगंज पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. त्या ठिकाणी पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. या वादातून त्यांना पोलिसांनी अंकिता यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली. याविरुद्ध त्यांनी पोलिस उपायुक्तांकडे तक्रार केली. तसेच माहितीच्या अधिकारात पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मागितले. 

प्रथम पोलिसांनी त्यांना फुटेज देण्यास नकार दिला. माहितीच्या अधिकारात अपीलामध्ये गेल्यानंतर उपायुक्तांनी फुटेज देण्याचे आदेश दिले. शाह यांना रविवारी हे फुटेज मिळाले. त्यानंतर त्यांनी ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले असता उलटसुलट चर्चेला उधाण आले. अंकिता यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस उपायुक्तांकडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे, पोलिस उपनिरीक्षक भावेश कावरे, शिपाई आतीश भाग्यवंत, प्रमोद राठोड, हिरा राठोड, देवीलाल तपे, चेतना बिसेन आणि माधुरी खोब्रागडे यांच्याविरुद्ध तक्रार केली.

त्यांच्यावर भादंविच्या कलम २९४, ३२४, ३३६, ३३७, ३४७, ३४८, ३८९, ३९१, ३९५ आणि ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, अशी माहिती अंकिता यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

गुन्हा दाखल करण्याची मागणी 

त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मास्क लावण्यावरून  वाद झाला होता. त्यामुळे अंकिता यांना मारहाण केल्याचे लकडगंज पोलिसांनी सांगितले. मात्र, फुटेजमध्ये चक्क पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे विनामास्कचे फिरताना दिसत आहेत, हे विशेष. अंकिता यांनी पोलिस आयुक्तांकडे पीआय हिवरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

संपादन  : अतुल मांगे