दोन तास पडून होते बिबट्याचे शव रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

बिबट्या मृत्युमुखी झाल्याची घटना लहान नसून अधिकारी, वन कर्मचाऱ्यांना या घटनेचे गांभीर्य नसल्याने घटनास्थळी पोहचण्यात एकप्रकारची हलगर्जी असल्याचे या घटनेवरून दिसून येते.

पारशिवनी  : पारशिवनी-रामटेक वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील पटगोवारी बिट अंतर्गत येणाऱ्या नयाकुंडजवळील पेंच नदीच्या पुलावर रविवारी (ता.24) अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.

ही घटना रविवारी रात्री अंदाजे 8.45 च्या सुमारास घडली. बिबट्याचे वय दीड वर्ष आहे. घटनेची माहिती पारशिवनीच्या पत्रकारांनी वनविभागाला दिली असता, पारशिवनी पोलिस तसेच पारशिवनी वनपरिक्षेत्राचे वनकर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. पण, घटना रामटेक वनपरिक्षेत्रात येत असल्याने घटनेची माहिती मिळूनही येथील अधिकारी व कर्मचारी तास दोन तासांनी घटनास्थळी पोहचले.

तोपर्यंत अनेकांनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रण करून घेतले होते. बिबट्याचा मृतदेह घटनास्थळी पडून राहिल्याने अखेर पारशिवनीच्या वन कर्मचाऱ्यांनी त्यावर प्लास्टीक झाकून ठेवले होते. त्यानंतरही रामटेक येथील वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची या ठिकाणी तास दोन तास वाट पाहावी लागली.
 

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, वणीत राजकीय वातावरण तापले

तोपर्यंत बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रामटेकवरून घटनास्थळ 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असूनसुद्धा या अधिकाऱ्यांना घटनस्थळावर येण्यास तास दोन तास लागत असेल तर वन्यप्राण्यांच्या जीवाप्रती किती जागरूक असल्याचे दिसून येत आहे. बिबट्या मृत्युमुखी झाल्याची घटना लहान नसून अधिकारी, वन कर्मचाऱ्यांना या घटनेचे गांभीर्य नसल्याने घटनास्थळी पोहचण्यात एकप्रकारची हलगर्जी असल्याचे या घटनेवरून दिसून येते. पुढील कार्यवाही रामटेक वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard were lying on the road for two hours