मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, वणीत राजकीय वातावरण तापले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

वणी येथील वणी ग्रामीण समाचार या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर सतीश पिंपरे यांनी तर फेसबुकवर व्यावसायिक विवेक पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले. 

वणी (जि. यवतमाळ) : सध्या कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. राज्यात कोरोनावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावरून टीका-टिपणीलाही सुरुवात झाली आहे. आता याचे लोण ग्रामीण भागापर्यंतही पोहोचू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांवर टीका करणे वणीतील दोघांना चांगलेच भोवले. शिवसेनेच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरोना आजाराने जगासह देशाला जेरीस आणले आहे. त्यातही महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 50 हजारांवर पोहोचली आहे. अशात महाराष्ट्र सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. निवेदने, काळे झंडे व फलक घेऊन सरकारचा निषेधही नोंदवित आहे. त्यामुळे चांगलेच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

जाणून घ्या - ज्याने जीवापाड जपले त्याच्याच जीवावर उठला हा वळू... वाचा ही करूण कहाणी

राज्यात सुरू असलेले हे लोण आता गाव पातळीवर येऊन पोहोचले आहेत. शिवसेना व भाजप समर्थकांमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू झाला आहे. वणी येथील वणी ग्रामीण समाचार या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर सतीश पिंपरे यांनी तर फेसबुकवर व्यावसायिक विवेक पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले. 

तालुका प्रमुख रवी बोढेकर यांच्यासह शहरप्रमुख राजू तुरणकार, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रांत चचडा, महेश चौधरी, नरेंद्र ताजने, ललीत लांजेवार, ऍड. अमोल बोरूले, प्रशांत बलकी, बंटी येरणे, अजिंक्‍य शेंडे, आदेश कोंगरे यांनी पोलिस ठाणे गाठून दोघांविरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आहे. या प्रकारामुळे वणीतील राजकारण तापण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

दोषींवर कठोर कारवाही करा 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाही झाली पाहिजे. अन्यथा शिवसेना कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. 
- विश्‍वास नांदेकर, 
जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offensive post about CM uddhav thakare on social media