हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

सेवानिवृत्तीच्या रकमेतून 15 लाख रुपये देत वाचनालय उभारले. त्यांची ही तळमळ लक्षात घेता, वाचनालयाला नागरिकांनी अडीच ते तीन लाख रुपयांची आर्थिक मदत केली. त्यातून आजघडीला कन्हान गावात सुसज्ज असे वाचनालय उभे झाले आहे. मुला-मुलींसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था असलेल्या वाचनालयातून शेकडो मुले स्पर्धा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

नागपूर : शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होतो. त्याच्यात सामाजिक जाणिव निर्माण होत असल्याचे बोलल्या जाते. मात्र, समाजात अशी माणसे बोटावर मोजण्याइतकी असतात. मिळालेल्या पदवीच्या भरोश्‍यावर चांगल्या पगाराची नोकरी आणि सेवानिवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगण्याचे स्वप्न प्रत्येकजणच बघत असतो. मात्र, सेवानिवृत्तीच्या पैशातून चक्क गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय तयार करण्याचे अद्वितीय कार्य डॉ.आंबेडकर विचारधारेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या सखाराम गणपत मंडपे यांनी केले आहे. आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

सविस्तर वाचा - तीन मुलांच्या आईला प्रियकराने दिला धोका अन झाले विपरित
मंडपे हे कन्हान येथील दखणे विद्यालयात मुख्याध्यापक होते. नोकरीत असतानाही कुठले ना कुठले सामाजिक कार्य ते सततच करीत राहायचे. आंबेडकरी विचारांचा अीयास करण्याची आवड होती. पण, नोकरीच्या व्यापामुळे अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे कठीण होते. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या एम. ए. आंबेडकर विचारधारा अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. डॉ. प्रदीप आगलावे यांच्या सहकार्याने त्यांनी अभ्यासक्रम केवळ यशस्वीरीत्या पूर्णच केला नाही तर सुवर्णपदकदेखील मिळविले. संसाराचा व्याप, समाजकार्य आणि वाचनालयाची जबाबदारी जोपासत त्यांनी हे यश मिळविले आहे. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी दरम्यानच्या काळात त्यांनी सेवानिवृत्तीच्या रकमेतून 15 लाख रुपये देत वाचनालय उभारले. त्यांची ही तळमळ लक्षात घेता, वाचनालयाला नागरिकांनी अडीच ते तीन लाख रुपयांची आर्थिक मदत केली. त्यातून आजघडीला कन्हान गावात सुसज्ज असे वाचनालय उभे झाले आहे. मुला-मुलींसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था असलेल्या वाचनालयातून शेकडो मुले स्पर्धा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. मंडपे स्वत: एमएससी, एमए सोशिओलॉजी, ऍडिशनल बीए इन इंग्लिश, बीएड झालेले आहेत. त्यांच्या पत्नी माला या कृषी विभागातून सेवानिवृत्त झाल्या आहेत. मुलगी अश्विनी पुणे येथे टीसीएस कंपनीत असून मुलगा आशुतोष नीरीमध्ये पीएच.डी. करत आहे. आजवरच्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय ते कुटुंबीयांच्या पाठिंब्याला देतात.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A library in Kanhan for students by retired teacher