वऱ्हांड्यात जेवण केल्यानंतर तेथेच झोपी गेल्या मग निघाला विळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

वऱ्हांड्यात जेवण केले आणि तेथेच झोपी गेल्यानंतर मीराबाई राठोड यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. परंतु, त्यांचे नशीब बलवत्तर असल्यानेच त्यांचा जीव वाचला. जीव घेण्यासाठीच हा हल्ला होता, असे सांगण्यात आले. हल्ला करणारा कोण होता, ते कळू शकले नाही.

नागपूर : मध्यरात्रीचे तीन वाजले होते. शेतमजूर 65 वर्षीय मीराबाई घरातील वऱ्हांड्यात झोपल्या होत्या. अचानक एक अज्ञात माथेफिरू तिथे आला त्याने मीराबाईंच्या गळ्यावर वार केला. परंतु, डोकं वर केल्याने डोळ्यावर बेतले. धारधार विळा डोळ्यात खुपसला गेला. रक्तबंबाळ अवस्थेत मीराबाईंना मेडिकलच्या "ट्रॉमा युनिट'मध्ये उपचारासाठी आणले. घटनेचे गांभीर्य ओळखत युद्धपातळीवर उपचार करण्यात आले. तब्बल दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर डॉक्‍टरांनी मीराबाईंना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. 

अंगावर शहारे आणणारी ही घटना पुसद तालुक्‍यातील आसोली गावातील आहे. वऱ्हांड्यात जेवण केले आणि तेथेच झोपी गेल्यानंतर मीराबाई राठोड यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. परंतु, त्यांचे नशीब बलवत्तर असल्यानेच त्यांचा जीव वाचला. जीव घेण्यासाठीच हा हल्ला होता, असे सांगण्यात आले. हल्ला करणारा कोण होता, ते कळू शकले नाही. 

सविस्तर वाचा - किती हा दरारा, पती रागावतील म्हणून महिलेने मुलांसह घेतली तलावात उडी

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मीराबाईला नातेवाइकांनी प्रथम यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे शस्त्रक्रियेची सोय नसल्याने मेडिकलच्या ट्रॉमा युनिटमध्ये रेफर केले. मीराबाईंना घेऊन नातेवाईक बुधवारी मेडिकलमधील ट्रॉमात दाखल झाले. ट्रॉमामधील विभागप्रमुख डॉ. मोहम्मद फैजल यांनी युद्धपातळीवर डॉक्‍टरांच्या पथकाला बोलावणे पाठवले. 

न्यूरोट्रॉमा शल्यचिकित्सक डॉ. पवित्र पटनायक, मेंदूरोगशल्यचिकित्सक डॉ. अंकुर संघवी, डॉ. रामानुज काबरा, डॉ. पलक जैस्वाल, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. दिव्यांजना, डॉ. शीतल, मॅक्‍सिलोफेशियल शल्यचिकित्सक डॉ. विकास मेश्राम, भूलतज्ज्ञ डॉ. धोरणे, डॉ. सोमा चाम यांच्या पथकाने दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर मीराबाईची मृत्यूच्या तावडीतून सुटका केली. 

ठळक बातमी - तुकाराम मुंढे इफेक्ट, दहाच्या ठोक्याला कार्यालयात पोहोचायला लागले मनपा कर्मचारी

डोळा कायमचा निकामी 
कोयत्याचा वार थेट डोळ्यावर होता. बुबूळ फुटलेले होते. महिलेच्या उजव्या डोळ्यांत विळा चार इंचपेक्षा अधिक आत खुपसला होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र, मीराबाईचा डोळा कायमचा निकामी झाला. जीव वाचविण्यात यश आले. सध्या डॉक्‍टरांच्या निरीक्षणात आहे. प्रकृती स्थिर आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात सर्व डॉक्‍टरांच्या प्रयत्नातून मीराबाईचा जीव वाचला. 
- डॉ. मोहमंद फैजल, 
विभागप्रमुख, ट्रॉमा केअर युनिट, मेडिकल, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life-threatening attack on the elderly